सिद्घी, कुणाल, नेहाच्या सुस्वर गायनाने देवरुखकर मंत्रमुग्ध
- rat२०p५.jpg-
P२५N९९७०२
देवरुख ः अभिरुची दिवाळी संगीत मैफील
संगीताने सजली देवरुखकरांची दिवाळी
सिद्धी, कुणाल, नेहा यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध ; अभिरुचीची मैफील
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २० : पंचतुंड नररुंड मालधर या नांदीने संगीत मैफिलीला सुरुवात झाली. कुणाल भिडे, नेहा प्रभुघाटे-साधले आणि सिद्धी शितूत यांनी एकापेक्षा एक उत्तमोत्तम गीते सादर करून देवरूखकर रसिकांना मंत्रमुग्ध केले.
देवरुख येथील अभिरुची संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देवरुखवासीयांना संगीतमय दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्ष आशिष प्रभुदेसाई आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अभिजात संगीत मैफिलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात कुणाल भिडे, नेहा प्रभुघाटे-साधले आणि सिद्धी शितूत यांनी पंचतुंड नररुंड मालधर या नांदीने केली. अथर्व आठल्ये (तबला), चैतन्य पटवर्धन (ऑर्गन), आदित्य साधले (हार्मोनियम) आणि नील भावे (तालवाद्य) यांच्या सुरेल साथीने ही संगीत मैफल अधिकच खुलून आली.
कुणाल भिडे याने आपल्या दमदार आवाजात सुखाचे जे सुख, झाले युवती मना दारुण रणरुचिर प्रेमसे, पद्मनाभा नारायणा अशी एकाहून एक बहारदार गीते सादर केली. नेहा प्रभुघाटे-साधले हिने निरुपणा ऐसे नाही समाधान, मतवारो बादल आयो रे, उगवला चंद्र पुनवेचा, बाजे मुरलिया बाजे ही गीते लीलया सादर केली. रसिकांनीही तिच्या गायनाला भरभरून दाद दिली. सिद्धी शितूत हिने नाथ हा माझा, खरा तो प्रेमा, हसले मनी चांदणे, वद जाऊ कुणाला शरण अशी गीते सादर करून मैफलीत रंग भरला. तिच्या सुस्वर गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. मैफलीचा समारोप कुणाल भिडे यांनी सादर केलेल्या अगा वैकुंठीच्या राया या भैरवीने झाला.
तबला अलंकार अथर्व आठल्ये याने एकल वादनात दिल्ली घराण्याच्या बाजाने तीन तालातील पेशकार, कायदा, रेला सादर केला. त्याला चैतन्य पटवर्धन यांनी लेहरासाथ केली. रसिकांनी संपूर्ण मैफलीला भरभरून दाद दिली. दिवाळी मैफलीसाठी मंगेश प्रभुदेसाई व अप्पा आठल्ये यांनी सूत्रसंचालन केले.
---
चौकट
कलाकारांचा गौरव
उदयोन्मुख गायक व वादक कलाकारांचा सन्मान व्हावा, या हेतूने देवरुख अभिरुची संस्थेने शहरातील गायक कलाकार कुणाल भिडे, नेहा प्रभुघाटे-साधले आणि सिद्धी शितूत तसेच तबला अलंकार अथर्व आठल्ये यांचा पाच हजार रुपयांच्या धनादेशाने गौरव केला. तसेच स्वराधिराज कोकणगंधर्व राजाभाऊ शेंबेकर आणि तबला विश्वातील गुरुवर्य गिरिधर कुलकर्णी यांचा सन्मान संगीत साधक श्यामकांत अळवणी यांच्या हस्ते करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.