लक्ष्मीवाडी मंडळाचा नरकासुर प्रथम
swt2017.jpg
99808
कुडाळ ः नरकासुर स्पर्धेला जिल्हाभरातील मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (छायाचित्रे ः अजय सावंत)
लक्ष्मीवाडी मंडळाचा नरकासुर प्रथम
कुडाळ शिवसेनेचे आयोजन; रथ, घोड्यांसह विविध चलचित्रे लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः आमदार नीलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राणे यांनी जिल्हावासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मीवाडी मित्रमंडळ, द्वितीय नेरुर येथील कलेश्वर मित्रमंडळ व तृतीय क्रमांक सावंत प्रभाकर मित्रमंडळाने मिळविला. स्पर्धेमध्ये कुडाळसह दोडामार्ग, वेंगुर्ले भागातील स्पर्धक सहभागी झाले.
कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदाच नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये रथ, घोडे, श्रीकृष्ण दाखविण्यात आले होते. श्रीकृष्णाकडून नरकासुराचा वध करतानाची चलचित्रे स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. स्पर्धेला रसिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. सुमारे १७ स्पर्धक यामध्ये सहभागी झाले. स्पर्धेचे उद्घाटन आमदार राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामाजिक यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार राजन तेली, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, ओंकार तेली, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, राजा गावडे (मालव), शहरप्रमुख अभी गावडे, महिला शहरप्रमुख श्रुती वर्दम, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, तालुका सरचिटणीस राकेश कांदे, प्रवक्ता रत्नाकर जोशी, चेतन पडते, देवेंद्र नाईक, अनिकेत तेंडोलकर, रेवती राणे, राकेश नेमळेकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ भैरव जोगेश्वरी मित्रमंडळ, बाजारपेठ मित्रमंडळ यांना गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेचा प्रतिसाद पाहता शहरप्रमुख अभी गावडे यांनी पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी ५५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक घोषित केले. सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.