''ओंकार''च्या ठिय्यासमोर बळीराजा हतबल
swt2110.jpg
99945
ओंकार हत्तीचे संग्रहित छायाचित्र.
swt2111.jpg
99946
मडुरा ः येथे कापणीयोग्य झालेले भातपीक ओंकार हत्तीच्या दहशतीमुळे वाया जात आहे.
‘ओंकार’च्या ठिय्यासमोर बळीराजा हतबल
मडुऱ्यात दहशतः २०० हेक्टरवरील भातपीक झडून जाण्याची भीती
नीलेश मोरजकर ः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ ः बांद्यापासून नजीक असलेल्या मडुरा गावातच गेल्या पंधरा दिवसांपासून ‘ओंकार’ हत्तीने ठिय्या मांडला आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने अनेक प्रयत्न केले; मात्र ते सर्व निष्फळ ठरले आहेत. भात कापणीचा हंगाम सुरू असून, हत्तीच्या धुमाकुळामुळे शेतकरी शेतात पाऊल ठेवायलाही घाबरत आहेत. परिणामी, गावातील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावरील तयार झालेले भातपीक जागेवरच झडून जाईल, अशी नामुष्की तयार झाली आहे. हे पीक घेण्यासाठी घाम गाळलेले शेतकरी हतबल होऊन दूरवरून या क्षेत्राकडे पाहत आहेत.
‘ओंकार’ हत्ती दोन महिन्यांपूर्वी दोडामार्ग केर येथून या परिसरात दाखल झाला. काही काळ नेतर्डे, डिंगणे जंगलात वावरल्यानंतर तो गोवा हद्दीत तांबोसे, तोरसे येथे निघून गेला होता. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी तेरेखोल नदी ओलांडून तो पुन्हा मडुरा गावाच्या हद्दीत स्थायिक झाला आहे. गावाच्या हद्दीतील डोंगरपट्ट्यांमध्ये, तसेच भातशेतीच्या कडेला असलेल्या ओढ्याच्या भागात तो वारंवार दिसून येतो. रात्रीच्या वेळी गावात आणि शिवारात त्याचे वावरणे वाढले आहे. अनेक ठिकाणी झाडे मोडणे, शेतकऱ्यांच्या पिकांवर हल्ले करणे, कडेला ठेवलेली भाताच्या गंजी उद्ध्वस्त करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. गावातील परबवाडी, रेडकरवाडी, रेखवाडी, बाबरवाडी, चवडीवाडी, जाधववाडी परिसरात सातत्याने हत्तीचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत.
हत्तीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने या भागात गेल्या आठवड्यापासून पथके नेमली आहेत. बांदा, दोडामार्ग आणि सावंतवाडी या तिन्ही ठिकाणच्या वनाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संयुक्त कारवाई सुरू आहे. हत्तीला स्थानबद्ध करण्यासाठी ‘वनतारा’ची टीम देखील दोन दिवस मडुरा गावात दाखल झाली होती. त्यांनी हत्तीच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास केला. मात्र, दाट जंगल, तसेच वस्ती जवळ असल्याने हत्तीला रेस्क्यू करणे अशक्य आहे.
मडुरा, कास, सातोसे गावांतील भातशेतीत या हत्तीने मोठे नुकसान केले आहे. मडुरा परिसर महत्त्वाचे भात उत्पादन केंद्र मानले जाते. या भागात प्रतिवर्षी शेकडो क्विंटल भात उत्पादन होते. मात्र, या वर्षी हत्तीच्या सततच्या हालचालींमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिली, तर कापणी पूर्णपणे थांबेल आणि पिके वाया जातील. ‘ओंकार’ने काही ठिकाणी पिके पायदळी तुडवून नष्ट केली गेली आहेत, तर काही ठिकाणी साठवलेल्या भाताच्या गंजी उद्ध्वस्त केल्या आहेत. शेतकऱ्यांचा भात कापणीचा हंगाम सध्या सुरू असून, गेल्या १५ दिवसांपासून हत्तीच्या भीतीने शेतात कोणीच जात नाही. त्यामुळे पिके वाळण्याची आणि नंतर अपुऱ्या मजुरांमुळे कापणी पूर्ण न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच अवकाळी पाऊस सुरू असल्याने भात पिकाला शेतातच कोंब फुटण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, ‘ओंकार’ हा तरुण नर हत्ती आहे. तो सध्या एकटाच आहे आणि काही प्रमाणात ‘सिंगल मस्ट’ अवस्थेत असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. त्यामुळे तो आक्रमक स्वभाव दाखवत आहे. मात्र, या परिसराचे भौगोलिक स्वरूप, घनदाट जंगल, ओढे, उंच-सखल भाग यामुळे कार्यवाही करणे कठीण ठरत आहे. मात्र, स्थानिकांचे म्हणणे आहे की वनविभागाची कार्यवाही केवळ कागदावर आहे. प्रत्यक्षात रात्रीच्या वेळी गावकऱ्यांनाच सावध राहावे लागत आहे. एकूणच हत्तीला दुसऱ्या जंगलात हलवावे आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकरी वर्गातून होत आहे.
चौकट
गावात भीतीचे वातावरण
गावात हत्तीच्या भीतीने रात्री बाहेर कोणीच फिरकत नाही. शाळेत जाणाऱ्या मुलांना पालक स्वतः सोडायला जातात. काही शेतांमध्ये हत्तीच्या पाऊलखुणा, मोडकी झाडे आणि नष्ट झालेल्या बांधामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. स्थानिक युवक रात्री हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, वनविभागाकडून आवश्यक उपकरणे, वाहन आणि सुरक्षेसाठी साधनसामग्री मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
चौकट
वनविभाग म्हणतो...
‘ओंकार’ सध्या मडुरा परिसरात आहे; पण त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहोत. तज्ज्ञांचे पथक बोलावण्यात आले आहे. हत्तीला काहीही इजा न होता त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नये.
कोट
वनविभागाची मोहीम गेल्या आठवड्यापासून सुरू आहे; पण काहीच परिणाम दिसत नाही. हत्तीला पकडण्यासाठी ठोस पावले उचला, नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करा, आवश्यक यंत्रणा आणा; पण शेतकऱ्यांचे नुकसान थांबवा. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाला निवेदन देऊन हत्तीला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासातील दुसऱ्या जंगलात हलवावे.
- बाळू गावडे, मडुरा उपसरपंच
कोट
आम्ही नेहमी भात कापणीसाठी पहाटे शेतात जायचो. मात्र हत्तीच्या हालचालींमुळे आता अंधार पडेपर्यंत कोणीच बाहेर पडत नाही. भात तयार आहे, पण कापणी करता येत नाही. एका हंगामाचे नुकसान झाले, तर पुढील पेरणीवरही त्याचा विपरित परिणाम होईल.
- प्रवीण परब, शेतकरी, मडुरा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.