मालवण पालिकेचे प्रशासन बेफिकीर
00445
मालवण पालिकेचे प्रशासन बेफिकीर
बाबी जोगी ः ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ धूळ खात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : दिवाळीच्या निमित्ताने शहराच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी उसळली असताना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ‘स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ मात्र नगरपालिकेच्या इमारतीत धूळ खात पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्याच महिन्यात शिरोडा येथे पर्यटकांवर झालेल्या जीवघेण्या अपघाताची पार्श्वभूमी असतानाही मालवण पालिकेचे प्रशासन मात्र बेफिकीर असल्याचे दिसत आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केली.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्या मालवणच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. समुद्राच्या लाटांचा आणि नयनरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक समुद्रात उतरत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपासून समुद्रात वादळी वातावरण असतानाही नगरपालिका प्रशासनाला पर्यटकांच्या जीवाचे काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र आहे. सुरक्षा साधनांचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्चून स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट खरेदी केली. काही दिवसांपूर्वी तिची केवळ चाचणी घेऊन ती नगरपालिका इमारतीत आणून ठेवली आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. मात्र, प्रत्यक्षात गरज असतानाही ती वापरली जात नसल्याचे दिसून येत आहे. एवढे पैसे खर्चून आणलेल्या या सुविधेचा उपयोग नेमका कधी होणार? नगरपालिका प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे काय? असा संतप्त प्रश्न श्री. जोगी यांनी उपस्थित केला आहे.
समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक जीवावर उदार होऊन समुद्रात उतरत आहेत आणि नगरपालिकेला याची काहीच फिकीर नाही. सुरक्षेच्या उपाययोजना शून्य असताना महत्त्वाचे साधन स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट केवळ धूळ खात पडले आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘आंधळा दळतंय, कुत्रं पीठ खातंय’, अशी सध्या मालवण पालिकेची स्थिती झाली आहे. नगरपालिकेला सध्या कोणी वालीच नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
---
शिरोडा दुर्घटनेनंतरही दुर्लक्ष का?
शिरोडा येथील दुर्घटनेनंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही. आता दिवाळीच्या गर्दीतही अशीच बेपर्वाई सुरू आहे. प्रशासनाने त्वरित या स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्टचा वापर सुरू करावा, किनाऱ्यावर पुरेसे जीवरक्षक नेमावेत आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोगी यांनी केली आहे. एखादी दुर्घटना घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मालवण नगरपालिका प्रशासनावर राहील, असा इशाराही जोगी यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

