‘अणाव महोत्सव’ विकासाची पर्वणी
00556
‘अणाव महोत्सव’ विकासाची पर्वणी
जयप्रकाश परब ः वारकरी दिंडी, महिला ढोलपथक, स्टॉल लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत अणाव आयोजित ‘अणाव महोत्सव २०२५’ गावविकासाची पर्वणी ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी केले.
श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर परिसरात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अणाव ग्रामपंचायतीतर्फे आयोजित अणाव महोत्सवाचे आयोजन केले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, लेखा व वित्त अधिकारी अमित मेश्राम, स्थानिक निधी सहाय्यक संचालक (लेखा) शिवप्रसाद खोत, सिंधुदुर्गनगरी पोलिस निरीक्षक शेखर लव्हे, संजय गोसावी, महादेव खरात यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
यानिमित्त प्राथमिक शाळा अणाव क्र.१ येथे स्वच्छता आरोग्य व देशभक्ती या विषयावर प्राथमिक, माध्यमिक, खुला या गटात रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वयंभू रामेश्वर मंदिरात रांगोळी स्पर्धा, ग्रामपंचायत सभागृह येथे पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला होता.
सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच आदिती अणावकर, पोलिसपाटील सुनील पाटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनायक अणावकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. पालववाडी महिला ग्रुपने स्वागत गीत सादर केले. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचतगट प्रतिनिधी उपस्थित होते.
---
विठ्ठल-रखुमाईचे रूप प्रमुख आकर्षण
पालववाडी ते स्वयंभू रामेश्वर मंदिर अशी वारकरी दिंडी काढण्यात आली. यात महिला, ग्रामस्थ, शाळकरी मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली. आवळेगाव येथील महिला ढोलपथकाची दिंडी आकर्षण ठरली. विठ्ठल-रखुमाईचे मुलांनी साकारलेले रूप तसेच पालखी या दिडींचे प्रमुख आकर्षण ठरले. स्वयंभू रामेश्वर मंदिर परिसरात रिंगण करून विठू माऊलीचा गजर करण्यात आला. त्यानंतर स्थानिक स्वयंसहाय्यता बचतगटांच्या दिवाळी फराळ व साहित्य स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायतीतर्फे शासकीय योजना व डिजिटल माहिती स्टॉल लावला होता.

