मतदारयादी तपासणी मोहीम युद्धपातळीवर
मतदारयादी तपासणी
मोहीम युद्धपातळीवर
सावंतवाडी ः महानगरपालिका, नगरपालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे बोगस मतदारयादी संदर्भात आक्षेप घेतला होता. मतदारयादी तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली होती. या मागणीनंतर आता निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यात मतदारयादी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागातील नगरपालिका क्षेत्रातील मतदारयादी तपासणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अलिकडेच महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे केव्हाही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि मनसे या चारही पक्षांनी मुंबईसह सर्व भागातील मतदारयादीत घोळ असल्याचा आक्षेप घेतला होता. मतदारयाद्यांमध्ये बोगस तसेच मृत व्यक्तींची नावे घुसडल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मतदारयादी तपासून नंतरच निवडणुका घेण्याची सूचना केली होती.
....................
निरवडेत १ नोव्हेंबरला
निमंत्रित भजन स्पर्धा
सावंतवाडी ः श्री देवी भराडी रवळनाथ निरवडे कोनापाल आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त निरवडे येथे १ नोव्हेंबरला निमंत्रित भजन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता, त्यानंतर ६ वाजता भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सायंकाळी ६ वाजता श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ, माजगाव (बुवा-कृणाल वारंग), सायंकाळी ६.४५ वाजता जैन महालक्ष्मी, वालावल (भूषण घाडी), ७.३० वाजता महापुरुष प्रासादिक, भोगवे (तुषार खुळे), रात्री ८.१५ वाजता लक्ष्मीनारायण प्रासादिक, वालावल (सूरज लोहार), ९ वाजता चिंतामणी भजन मंडळ, सुरंगपाणी वेंगुर्ले (अनिकेत भगत), ९.४५ वाजता साई खोडदेश्वर भजन मंडळ, पिंगुळी (गौरव धुरी), १०.३० वाजता गोठण भजन मंडळ, वजराट (सोमेश्वर वेंगुर्लेकर), ११.१५ वाजता श्री देव समाधी पुरुष प्रासादिक, मळगाव (गौरांग राऊळ), १२ वाजता सद्गुरू भजन मंडळ, अणसूर वेंगुर्ले (हर्षल मेस्त्री), १२.४५ वाजता सिद्धिविनायक मंडळ, कणकवली (दुर्गेश मिठबावकर) यांचा समावेश आहे. प्रथम ७००१, द्वितीय ५००१, तृतीय ३००१ व प्रत्येकी सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रथम १५०१, द्वितीय १५०१ रुपये तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येतील.
..................
बुद्धिबळ स्पर्धेत
सोहम प्रथम
सावंतवाडी ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग, ओरोस येथे झाली. या स्पर्धेत एकूण आठ तालुक्यांतील १४ वर्षीय गटातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यामध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा सातवीमधील विद्यार्थी सोहम देशमुख सहा फेऱ्यांमध्ये टिकून राहिला व ५.५ गुण प्राप्त करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची विभाग स्तरावर निवड झाली असून तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांतर्फे सोहमचा सन्मान करण्यात आला. प्रशालेचे संचालक ऋजुल पाटणकर व मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनीही त्याचे या यशाबद्दल कौतुक केले.
.....................
वेंगुर्ले हायस्कूलचे
क्रीडा स्पर्धेत यश
वेंगुर्ले ः जिल्हास्तरावर घेतलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत वेंगुर्ले हायस्कूलच्या सहा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत विभागस्तरावर मजल मारली. यात हर्ष म्हाडदळकर याने लांब उडीमध्ये प्रथम व मान्यता पेडणेकर द्वितीय, राज प्रजापती १०० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय, ८०० मीटर धावणेमध्ये विधी परब प्रथम, बुद्धिबळमध्ये विठ्ठल कोरगावकर चतुर्थ यांनी क्रमांक पटकाविले. अरमान शेख याची कबड्डी निवड चाचणीत १७ वर्षांखालील गटात निवड झाली. सर्व खेळाडूंना आर. डी. केर्लेकर. टी. आर. गायकवाड, संजीवनी चव्हाण, संदीप पेडणेकर व दिलीप मालवणकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचे मुख्याध्यापक एस. ए. बीडकर, आर. व्ही. थोरात यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले.
---
माजगाव महादेवाची
जत्रा नोव्हेंबरमध्ये
ओटवणे ः माजगाव येथील श्री महादेवाचा वार्षिक जत्रोत्सव ६ नोव्हेंबरला होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर महादेवाच्या दर्शनास प्रारंभ होणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत, सचिव जयंत कानसे तसेच देवस्थानच्या सर्व मानकऱ्यांनी केले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५ नोव्हेंबरला महादेव मंदिरात सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. भजनानांनतर पालखी सोहळा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

