आरोग्यप्रश्नी न्यायालयाने दखल घ्यावी
00771
आरोग्यप्रश्नी न्यायालयाने दखल घ्यावी
ॲड. महेश राऊळ ः सावंतवाडीत कृतज्ञता गौरव सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी आणि अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने कळसुलकर हायस्कूलच्या परुळेकर सभागृहात आरोग्य विषयक जनहित याचिका विनामूल्य लढवणारे उच्च न्यायालयातील वकील तथा सावंतवाडीचे भूमिपुत्र ॲड. महेश राऊळ यांचा कृतज्ञता गौरव समारंभ रविवारी (ता. २६) उत्साहात झाला. यावेळी सत्कारमूर्ती ॲड. राऊळ यांनी ‘आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात आता न्यायालय गंभीर दखल घेईल आणि इथली परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे,’ असे भाष्य केले.
सावंतवाडीकर म्हणून इथल्या परिस्थितीची जाण असल्याने मातृभूमीसाठी योगदान देणे, ही आपली जबाबदारी असल्याचे सांगत, गंभीर रुग्णांच्या गोवा-बांबोळी, कोल्हापूर फेऱ्या थांबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै यांच्या हस्ते ॲड. राऊळ यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठसकर, अभिनव फाउंडेशनचे सचिव अण्णा म्हापसेकर, किशोर चिटणीस, डॉ. प्रसाद नार्वेकर यांची उपस्थिती होती.
ॲड. राऊळ म्हणाले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयात २०१३ मध्ये ही जनहित याचिका दाखल झाली. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत आरोग्य व्यवस्थेची स्थिती तशीच आहे, यात सुधारणा नाही. ही फार गंभीर समस्या आहे. या भागातील असल्याने मी सामाजिक कार्यात हातभार लावत आहे, जेणेकरून येथील जनतेचे जीव वाचावेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची सत्य परिस्थिती न्यायालयासमोर आल्याने आता न्यायालयाच्या आदेशापूर्वी शासनाकडून डॉक्टरांच्या नेमणुका व सुधारणा करण्याचे आदेश दिले जातात का?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.’’
ॲड. पार्सेकर यांनी, राजकीय अनास्थेमुळे आरोग्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून रुग्णांना गोवा-बांबोळी येथे हलवावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. ॲड. राऊळ यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये ही लढाई पुन्हा सुरू केली, ही कौतुकास्पद बाब आहे.
डॉ. नार्वेकर यांनी, अभिनव फाउंडेशनने याचिका दाखल केली असतानाही एका भाजी विक्रेत्याला उपचाराअभावी गोवा-बांबोळी येथे जीव गमवावा लागला, ही वेदनादायक बाब असल्याचे सांगितले. प्रा. सुभाष गोवेकर यांनीही आरोग्यप्रश्न तातडीने सुटला पाहिजे, असे मत व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ आणि पोलिसपाटील संघटनेतर्फे ॲड. राऊळ यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.....................
मूलभूत गरजांसाठी अजूनही संघर्षच
शैलेश पै म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य मिळून ७५ हून अधिक वर्षे झाली, तरीही रस्ते, पाणी, वीज, आरोग्य अशा मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे, ही शोकांतिका आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून यासाठी एकत्र येऊन जनतेला न्याय द्यावा. सामाजिक भावनेतून अभिनव फाउंडेशनची जनहित याचिका विनामूल्य लढवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा ॲड. राऊळ यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.’’ यावेळी त्यांनी ॲड. राऊळ यांच्या निःस्वार्थ कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

