मच्छीमार, शेतकऱ्यांसमोरील संकटे संपेनात

मच्छीमार, शेतकऱ्यांसमोरील संकटे संपेनात

Published on

मच्छीमार, शेतकऱ्यांसमोरील संकटे संपेनात

अवकाळीचा मोठा फटका; पर्यटन हंगामावर टांगती तलवार

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः परतीच्या लांबलेल्या पावसामुळे कोकण किनारपट्टीवर मच्छीमारांसह स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अलिकडच्या काळात समुद्री वादळांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. पावसामुळे शेतमालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. मध्यंतरी घाटमाथ्यासह वरच्या भागात झालेल्या अतिवृष्टीचा थेट परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर होताना दिसत असून कोकणातील पर्यटन हंगामावरही पावसाचा परिणाम जाणवताना दिसतो.
कोकणचे निसर्गसौंदर्य येथील वैभव आहे. त्याला स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांची जोड आहे. त्यामुळे समुद्राच्या ओढीने घाटमाथ्यासह वरील अन्य भागातील पर्यटकांच्या नकाशावर कोकण असते. विशेषतः उन्हाळी आणि दिवाळी हंगामात कोकणात पर्यटकांचा ओढा अधिक असतो. शिवाय पावसाळ्यातील प्रवाहित होणारे कोकणातील नैसर्गिक धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे अलिकडच्या काही वर्षात उन्हाळी तसेच दिवाळी सुटीबरोबरच ‘विकेंड’ असा नवा ट्रेंड वाढीस लागताना दिसतो. तसेच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत समुद्राच्या साक्षीने करावे यासाठी वर्षअखेरीसही कोकणचे समुद्रकिनारी गर्दीने ‘हाऊस फुल्ल’ असतात. मात्र ज्यावेळी शेती, व्यवसायात बरकत असेल त्याचवेळी माणूस स्वखुशीने पर्यटनाचे बेत आखतो.
यंदा मेच्या मध्यापासून वळवाच्या पावसाने आणि त्याला जोडूनच मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक व्यवसाय वेळेआधी गुंडाळावे लागले. पावसामुळे आर्थिक वर्तुळ पूर्णत्वास जाण्यामध्ये अनेक अडचणी जाणवल्या. मुख्य व्यवसाय ज्यावेळी अडचणीत सापडतो त्यावेळी आपोआपच पूरक व्यवसायही कोलमडतात. मासळी आणि आंबा हंगामाच्या बाबतीत यंदा हेच झाले. हे दोन्ही हंगाम वेळेआधी आटोपते घ्यावे लागले. आता परतीचा पाऊस थांबून हंगामाची नव्याने सुरूवात होत असताना पुन्हा पावसाचे सावट कायम आहे. कोकणातील समुद्रकिनारचे घाटमाथ्यावरील मंडळींना विशेष आकर्षण असते. मात्र, मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जावून नुकसानीला सामोरे जावे लागले. हातातोंडाशी आलेल्या पिकांची पुरपरिस्थीने दाणादाण उडवली. पर्यायाने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तेथील शेतकऱ्यांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. मात्र, यामुळे केवळ त्या भागातील शेतकऱ्यांना आणि बाजारपेठेला झळ बसण्याएवढा हा विषय मर्यादित राहिला नसून येथील पर्यटन हंगामालाही त्याची झळ बसली. ज्यावेळी शेतीमध्ये सुबतत्ता असते त्यावेळी आपोआपच पर्यटनाचे बेत आखले जातात. मात्र, यंदाच्या पावसाने अप्रत्यक्षपणे येथील पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. खासगी वाहने घेऊन पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. पर्यायाने पुरक व्यवसाय अडचणीतून वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.
..............................................
मच्छीमारीला ब्रेक
१ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा मच्छीमारी बंदी कालावधी असतो. १ ऑगस्टपासून नव्या मच्छीमारी हंगामाची सुरूवात होत असली तरीही खऱ्या अर्थाने पावसाचा अंदाज घेऊनच मासेमारी हंगामाचा प्रारंभ होतो. साधारणतः गणेशोत्सवानंतर मासेमारी हंगामाला सुरूवात होते. मात्र, यंदा याच दरम्यान पावसाचा जोर झाल्याने मच्छीमारी नौका बंदरात थांबून होत्या. आता पुन्हा समुद्री वादळाचे सावट असल्याने बंदरात मच्छीमारी नौका परतल्या असून हंगामाला ब्रेक लागला आहे.
....................................................
मोहोर प्रक्रिया लांबणार
आंबा हंगामासाठीही पावसानंतर पडणारी थंडी मोहोर येण्यासाठी अनुकुल मानली जाते. मात्र, अजूनही पावसाचा जोर सुरूच असल्याने झाडांना पालवी येण्यास विलंब लागू शकतो. आलेली पालवी जून झाल्यानंतर त्यातून मोहोर येण्याची प्रक्रिया असल्याने यंदा पावसामुळे ही प्रक्रिया लांबण्याची शक्यताही मानली जाते. आता फवारणीच्या दृष्टीने बागांची साफसफाई होत असतानाच पुन्हा पावसामुळे गवत वाढण्याची बागायतदारांना चिंता आहे.
..........................................
वादळांच्या प्रमाणात वाढ
अलिकडच्या काही वर्षात समुद्री वादळांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किनारी भागातील वातावरण अधनमधून अस्थिर असते. अशावेळी मासळी हंगामावर परिणाम शक्य असला तरी समुद्राशी निगडित असलेले पर्यटनही थंडावते. प्रशासन काळजीपोटी अशा पर्यटनस्थळांवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करते. पर्यायाने पर्यटन हंगामावर त्याचा परिणाम दिसतो.
...................................
कोट
मेच्या मध्यापासून पाऊस सुरू झाल्याने पर्यटकांची संख्या कमी झाली. पर्यटनस्थळांवर खासगी वाहने घेऊन येणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसते. अशावेळी वाहन पार्किंगच्या व्यवसायावर त्याचा थेट परिणाम जाणवतो. वाहन पार्किंग ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तींचे मानधनही त्यातून भागत नाही अशी स्थिती होती. अनेकदा खिशातून त्यांचे मानधन भागवण्याची वेळ आली. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर पाऊस, अतिवृष्टी याचा परिणाम शक्य आहे.
- पार्किंग व्यावसायिक, देवगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com