बोर्डिंग रोड परिसरातील वीजपुरवठा सुरळीत
बोर्डिंग रोड परिसरातील
वीजपुरवठा सुरळीत
रत्नागिरीः रत्नागिरी प्रभाग क्र. २ मधील बोर्डिंग रोड येथे बीएसएनएल कार्यालयासमोरील गार्डनमधील जुने झाड विद्युतवाहिनीवर कोसळले होते. त्यामुळे तेथील विद्युतखांब मोडून पडला. त्यामुळे तेथील परिसरात वीज गेली होती तसेच तेथील परिसरात अंधार झाला होता. ही माहिती नागरिकांनी निमेश नायर यांच्यापुढे मांडली. त्यांनी तत्काळ महावितरण कर्मचारी आणि नगरपालिकेशी संपर्क साधला. बोर्डिंग रोडवरील घडलेल्या प्रकाराची माहिती देऊन तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या. थोड्या वेळात महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोसळलेले झाड बाजूला केले तसेच लगेचच वीजपुरवठा सुरळीत झाला.
------
डिसेंबर महिन्यात
कुणबी महोत्सव
संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण संस्कृतीला एक नवी ओळख आणि विकासाची नवी दिशा देण्यासाठी कुणबी महोत्सवाचे आयोजन ६ आणि ७ डिसेंबर रोजी संगमेश्वर तालुक्यातील करंबेळेतर्फे देवळे येथील गोताडवाडीत होणार आहे. संस्कृती, कला, क्रीडा आणि स्वाभिमान या चार स्तंभांवर आधारित हा महोत्सव ग्रामीण जीवनातील चैतन्य पुन्हा जागृत करणारा ठरेल, असा विश्वास आयोजक सुहास खंडागळे, उदय गोताड यांनी व्यक्त केला आहे. हा महत्त्वाकांक्षी महोत्सव आयोजित करण्यासाठी गावविकास समितीच्या संघटन प्रमुखांनी पुढाकार घेतला आहे.
------
चिपळूणला मोबाईल
फॉरेन्सिक व्हॅन द्या
शिरगांव : चिपळूण येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून द्या, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिरगाव येथील सुरजराव शिंदे यांनी केली आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध होणे का महत्वाचे आहे, हे संबंधितांना त्यांनी पटवून दिले आणि या विषयीचे निवेदनही सादर केले. चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भाग हा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात शहरीकरणाकडे वाटचाल करत आहे. त्याचबरोबर अवतीभोवती गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढत आहे. सध्या प्रगत युगात गुन्हेगार नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंबन करत आहेत तसेच चिपळूण येथून दोन महामार्ग जात असल्याने पोलिस प्रशासनावरचा कामाचा ताणही वाढत आहे. चिपळूण उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली तर भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजिटल पुरावे घटनास्थळावरच उपलब्ध करून देणे शक्य होईल. त्याचा गुन्हा तपासात उपयोग होणार आहे.
-------
शेट्ये हायस्कूलला
डॉ. रोकडेंकडून देणगी
रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी जपत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. तुलसीदास रोकडे यांनी बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलला ५१ हजार रुपयांची देणगी दिली. ही देणगी पूर्णतः सामाजिक भावनेतून शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी दिली असून, या उदार योगदानाबद्दल बसणी पंचक्रोशी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक, पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. रोकडे यांच्या या कार्यातून समाजात शिक्षणाविषयीची जाणीव आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत होत असल्याचे मत संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. जी. एम. शेट्ये हायस्कूलमुळे पंचक्रोशीतील विविध गावांतील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावातही शाळेने गेली जवळपास ५० वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले आहे. यामुळेच डॉ. रोकडे यांनी देणगी देऊन विद्यार्थ्यांना नवनवीन सुविधा देण्याचे सुचवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

