अवजड वाहनांमुळे बहादूरशेख नाक्यात कोंडी
-rat२८p४.jpg -
२५O००९२३
चिपळूण : बहादूरशेख नाका येथे वळणावर अवजड वाहतूक करणारे कंटेनर आल्यानंतर चारही बाजूने वाहतूककोंडी होते.
----
अवजड वाहनांमुळे बहादूरशेख नाक्यात कोंडी
वाहतूक पोलिसांची कसरत; दिवाळी सुटीमुळे रहदारीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ : दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. बहादूरशेख नाका येथील वळणावर लांब आकाराची अवजड वाहने वळत नाहीत, त्यामुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. येथील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांना २४ तास अलर्ट राहावे लागत आहे.
दिवाळीनिमित्त कोकणात गेलेले चाकरमानी आता शनिवार-रविवारी मुंबईकडे परतू लागले आहेत. शाळांच्या सुटीचा हंगाम संपण्यासाठी अजून अवधी आहे तरीही चाकरमानी परतीच्या मार्गावर आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. प्रामुख्याने बहादूरशेख नाक्यातील अवघड वळणाची अनेकांना अडचण होत आहे. बहादूरशेख नाक्यावर वेगवेगळ्या दिशेने जाण्यासाठी मार्ग आहेत. एक मार्ग चिपळूण शहरांमध्ये, दुसरा गोव्याकडे, तिसरा मुंबईकडे आणि चौथा कऱ्हाडकडे जाणारा मार्ग आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. येथे डांबराचे पिंप लावून वाहतुकीला दिशा देण्यात आली आहे. मुंबईहून येणारे वाहन कऱ्हाडच्या दिशेने वळताना मोठी जागा लागते. सध्या असलेली जागा एसटी, खासगी बस, ट्रक आणि कंटेनरसाठी अपुरी पडत आहे. नाक्यावर मोठी वाहने वळवताना अंदाज येत नाही. त्यामुळे मोठी वाहने छोट्या वाहनांना धडकतात. अनेकवेळा मोठी वाहने वळत असताना छोट्या वाहनांचे चालक पुढे जाण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करत असतात अशावेळी किरकोळ अपघात होतात. हा प्रकार नेहमीचा झाला आहे.
एखादा अपघात झाला तर दोन वाहनचालकांमध्ये हमरातुमरी सुरू होते. अशावेळी रस्त्यावर चारही बाजूने वाहनांच्या रांगा लागतात. अशा वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना मनस्ताप होत असून, त्यांच्या वेळेचा अपव्यय होतो आहे. या कोंडीमुळे त्यांना नियोजित ठिकाणी नियोजित वेळेत पोहोचण्यास उशीर होतो आहे. दोन वाहनचालकांमध्ये किरकोळ अपघात होऊन बाचाबाची झाली तरी ते सोडवण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर येते. अशावेळी वाहतूक सुरळीत ठेवून वाहनचालकांच्या भानगडी सोडवण्याचे काम वाहतूक पोलिसांना करावे लागते. सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांना हा त्रास सहन करावा लागतो.
---
कोट
अवजड वाहनांमुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहेत. एखादे वाहन अपघात करून पुढे निघून जाते. ज्या वाहनांचे जास्त नुकसान होते ते वाहनचालक आमच्याकडे येतात. कधी कधी रस्त्यात मारामारीचा प्रकार घडतो. किमान दिवसा मोठी वाहने या मार्गावर चालवू नयेत, अशा सूचना आम्ही करत असतो.
- गणेश नाळे, वाहतूक पोलिस कर्मचारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

