रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा त्रास थांबवा
रत्नागिरीतील मोकाट गुरांचा त्रास थांबवा
प्रसाद सावंत ः ठाकरे शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः रत्नागिरी शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते निवासी भागांपर्यंत तसेच बाजारपेठा आणि शाळांच्या परिसरातही गुरांचा संचार वाढल्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्याच्या मधोमध मोकाट गुरे बसल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून, अनेकवेळा अपघातांची उदाहरणे समोर आली आहेत. यावर त्वरित उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटक आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे. 
शहरातील जयस्तंभ चौक, टिळक स्मारक परिसर, बसस्थानक परिसर तसेच महामार्गावर आणि मिरजोळे औद्योगिक क्षेत्राजवळ मोकाट जनावरांचे प्रमाण विशेषतः वाढले आहे. नागरिकांनी अनेकदा नगरपालिका आणि ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या असल्या तरी ठोस कारवाईचा अभाव असल्याची नाराजी सावंत यांनी व्यक्त केली. पालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून काहीवेळा जनावरांना पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले असले तरीही आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधांच्या अभावामुळे हे प्रयत्न अल्पकालीन ठरतात. पकडलेली जनावरे काही दिवसांत पुन्हा रस्त्यावर दिसू लागतात. अनेक पशुपालक आपल्या गुरांना सकाळी सोडून देतात आणि संध्याकाळी परत नेतात तर काहीजण नेतही नाहीत, अशीही तक्रार स्थानिकांकडून केली जाते. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवणे, शाळकरी मुलांची सुरक्षितता आणि दुचाकीस्वारांचे होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आहे, असेही मत सावंत यांनी व्यक्त केले तसेच मोकाट गुरांचा प्रश्न फक्त वाहतुकीपुरता मर्यादित नसून स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेच्यादृष्टीनेही गंभीर ठरत आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या गावमध्येही प्रशासनाकडून तातडीने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त त्यांनी केली आहे.

