''आम्ही साहित्यप्रेमी''तर्फे आज ''बालकवी : एक शापित गंधर्व''
‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे आज
‘बालकवी : एक शापित गंधर्व’
सकाळ वृत्तसेवा 
ओरोस, ता. ३० ः ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ऑक्टोबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त उद्या (ता. ३१) सायंकाळी ५ वाजता ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग''प्रणित’ आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा आठवा मासिक कार्यक्रम आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. आनंदी आनंद गडे, औदुंबर, फुलराणी, श्रावणमास या त्यांच्या प्रसिद्ध कवितांपैकी काही होत. त्यांनी ७५ हून अधिक बालकविता लिहिल्या, त्याचबरोबर ‘औदुंबर’सारखी गूढगहन कविताही लिहिली. बालकवींची काव्यकारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती; मात्र त्यांचे मराठी साहित्यातील स्थान अढळ आहे. 
यावेळचा कार्यक्रम बालकवी यांच्या काव्यसंपदेविषयी आहे. या कार्यक्रमात ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ (कार्यक्रमाचे बीजभाषण, सतीश लळीत), ‘बालकवी आणि लक्ष्मीबाई टिळक’ (डॉ. सई लळीत), कविता ‘उदासीनता’ (प्रगती पाताडे), कविता ‘औदुंबर’ (मनोहर सरमळकर), ‘औदुंबर’चे रसग्रहण (ॲड. सुधीर गोठणकर), एक कविता व रसग्रहण (वैदेही आरोंदेकर), बालकवी-मराठी कविताला पडलेले स्वप्न (नम्रता रासम) आदी विचार मांडणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.

