''अनमोल'' प्रभागसंघाला नवी दिशा
swt305.jpg
01356
मळगाव ः येथे आयोजित अनमोल प्रभागसंघ तळवडेच्या एकदिवसीय प्रभागस्तरीय मूल्यमापन कार्यशाळेला प्रतिसाद मिळाला.
‘अनमोल’ प्रभागसंघाला नवी दिशा
मळगावात मूल्यमापन कार्यशाळाः प्रभागस्तरीय कामांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ आणि ‘कुटुंब श्री केरळ ''एनआरओ'' यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पीआरआय-सीबीओ अभिसरण प्रकल्पांतर्गत अनमोल प्रभागसंघ, तळवडेची एकदिवसीय ‘प्रभागस्तरीय मूल्यमापन कार्यशाळा’ बुधवारी (ता. २९) मळगाव येथे उत्साहात पार पडली. प्रकल्पांतर्गत प्रभागस्तरावर झालेल्या कामांचा आढावा घेणे, त्याचे मूल्यमापन करणे आणि भविष्यातील दिशा निश्चित करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तळवडे ग्रामपंचायत सदस्य दादा परब, श्री. मांजरेकर आणि नम्रता गावडे उपस्थित होते. तसेच ‘कुटुंब श्री केरळ’ च्या मेंटॉर गिरिजा संतोष, तालुका अभियान कक्षातून स्वाती रेडकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रार्थना आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रभागसंघाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रभाग समन्वयक सचिन नाईक यांनी प्रास्ताविक केले आणि प्रकल्पाची उद्दिष्ट्ये व आतापर्यंतचा प्रवास स्पष्ट केला. ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या कामाच्या सादरीकरणामध्ये मयुरी दळवी, निकिता बुगडे, चैताली गावडे आणि पायल राऊळ आदी एलआरपींचा समावेश होता. त्यांनी आपापल्या ग्रामपंचायतनिहाय केलेल्या कामाचे सविस्तर पीपीटीद्वारे सादरीकरण केले आणि मनोगत व्यक्त केले.
यासोबतच प्रभागात झालेल्या कामाचे व्हिडिओ प्रेझेन्टेशनही दाखविण्यात आले. त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि व्याप्ती स्पष्ट झाली. यानंतर मान्यवरांनी प्रकल्पांतर्गत केलेल्या विविध उपक्रमांच्या प्रदर्शनीला भेट दिली. या प्रदर्शनीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे फाईल्स, तक्ते आणि माहितीचा संग्रह उत्कृष्ट पद्धतीने मांडला होता. कार्यशाळेत बालसभा प्रतिनिधी म्हणून वैदेही राऊळ, सानवी गावडे, सिद्धाई वेटे आणि दत्तप्रसाद तेली यांनीही मनोगत व्यक्त केले.
डीआरपी श्रावणी वेटे, बीआरपी प्राची राऊळ, प्रभागसंघ पदाधिकारी विशाखा ठाकूर, रंजना तेली, संगीता राऊळ, कार्यकारी समितीचे सदस्य, सर्व एलआरपी व सीआरपी आणि इतर कॅडर कार्यशाळेत सक्रिय सहभागी झाले.
सूत्रसंचालन प्रभागसंघ सचिव रंजना तेली यांनी केले. प्रभागसंघाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानून कार्यशाळेची यशस्वी सांगता करण्यात आली. या कार्यशाळेमुळे ''अनमोल प्रभागसंघा''चे काम अधिक बळकट होऊन ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

