''जागर गडदुर्गांचा''चे १६ ला बक्षीस वितरण
‘जागर गडदुर्गांचा’चे
१६ ला बक्षीस वितरण  
कुडाळः श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबईच्या सहकार्याने दीप दुर्गोत्सव सोहळा २०२५ अंतर्गत आयोजित ‘जागर गडदुर्गांचा’ स्पर्धेचे बक्षीस वितरण १६ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली. कार्यक्रमाच्या दिवशी उपस्थित राहणाऱ्या मावळ्यांना इतिहास संकलक आप्पा परब आणि सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्यातर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. अनुपस्थित राहिल्यास नंतर फक्त प्रमाणपत्र देण्यात येईल, सन्मानचिन्ह दिले जाणार नाही. अधिक माहितीसाठी राहुल मांडवकर, सर्वेश चेंदूरकर, चेतन निखारगे, ऋषी शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.
....................
मालवणात आज
‘रन फॉर युनिटी’
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आणि मालवण पोलिस ठाण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात उद्या (ता. ३१) सकाळी ७ ते ९ यावेळेत देऊळवाडा, रेवतळे तिठा ते देऊळवाडा अशी भव्य ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. या दौडीत मालवण पोलिस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार आणि पोलिसपाटील यांच्यासह शहरातील पत्रकार, आस्था ग्रुप, रोटरी क्लब, लायन्स क्लब, मातृत्व आधार फाउंडेशन, ग्लोबल रक्तदाते, स्वराज्य संघटना, पाटीदार समाज, डॉक्टर फॅटर्निटी क्लब, झुंबा ग्रुप, इतर सेवाभावी संस्था व नागरिक सहभागी होणार आहेत. सर्व नागरिकांनी पांढरे टी-शर्ट आणि ट्रॅक पँट अशा पेहरावात सहभागी व्हावे. या भव्य ‘रन फॉर युनिटी’मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक जगताप यांनी केले आहे.
....................
आडेलीतील पथदीप 
अद्यापही नादुरुस्त 
वेंगुर्लेः सावंतवाडी-आडेली या मुख्य मार्गावरील आडेली-खुटवळवाडी येथील पथदीपांची समस्या अद्याप ‘जैसे थे’ आहे. याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू कोंडसकर यांनी वारंवार लक्ष वेधूनही दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. शासनाने येथील ग्रामस्थांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात पथदीप उभारले आहेत, परंतु योग्य वेळेत वीजपट्टी भरूनही स्ट्रीटलाईट सुरू करण्यास संबंधित प्रशासन, ठेकेदार अपयशी ठरले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पथदीपांच्या तारांवर मोठ्या प्रमाणात जीर्ण झाडे, झाडी वाढली आहे. ग्रामपंचायतीने विजेच्या तारांवरील झाडीझुडुपे तोडण्यासाठी संबंधित विभागाचे लक्ष वेधावे, अशी मागणी होत आहे. आडेली-खुटवळवाडी येथील पथदीप तातडीने सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
...................
सातार्डा रवळनाथ
जत्रोत्सव बुधवारी 
सावंतवाडीः सातार्डाचे ग्रामदैवत रवळनाथ पंचायतन देवस्थानचा जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला बुधवारी (ता. ५) होणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. ६) रवळनाथ पंचायतन देवस्थानचा कवळास सोहळा होणार आहे. जत्रोत्सवादिवशी बुधवारी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी नैवेद्य, रात्री ११ वाजता पालखी प्रदक्षिणा, नंतर आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता दरम्यान कवळास सोहळ्याला थाटात सुरुवात होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या वतीने केले आहे.
....................
हरिनाम सप्ताहाचे
झोळंबेत आयोजन 
ओटवणेः झोळंबे येथील विठ्ठल मंदिरात कार्तिक एकादशी उत्सवानिमित्त शनिवारपासून (ता. १) हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी (ता. ३) दुपारी होणार आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजता ज्योतीपूजन आणि हरिपाठाने हरिनाम सप्ताहाला सुरुवात होणार आहे. रविवारी पहाटे ५ वाजता काकड आरती, भजन, दुपारी महापूजा, सायंकाळी ७ वाजता हरिपाठ, त्यानंतर रात्रभर भजनाचा अखंड गजर सुरू राहणार आहे. सोमवारी द्वादशीदिवशी पहाटे ५ वाजता काकड आरती, महापूजा, भजने, सकाळी ११ वाजता दिंडी, दुपारी महाप्रसादाने या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.

