‘एआय’ वापरात सिंधुदुर्ग ‘लीडर’ ठरेल
01659
‘एआय’ वापरात सिंधुदुर्ग ‘लीडर’ ठरेल
डॉ. देवव्रत त्यागी ः देशभरातील इतर जिल्हे प्रेरणा घेतील
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३१ ः प्रशासनातील प्रत्येक विभागाने ज्या प्रकारे तंत्रज्ञान स्वीकारले आहे, ते पाहता सिंधुदुर्ग ‘एआय वापरामधील लीडर जिल्हा’ ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या वाटचालीकडे देशभरातील इतर जिल्हे प्रेरणेने पाहतील आणि या प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी नक्कीच सिंधुदुर्गला भेट देतील, असे कौतुक नीती आयोग समितीचे सदस्य डॉ. देवव्रत त्यागी यांनी दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्याच्या समारोप प्रसंगी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने शासनव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केल्याने, देशात या तंत्रज्ञानाच्या अंगीकारात सिंधुदुर्ग अग्रेसर ठरला आहे. या अभिनव उपक्रमाचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडित निती आयोगाचे विशेष पथक दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. या दौऱ्यात पथकाने जिल्हा प्रशासनातील विविध विभाग कशा प्रकारे आपल्या दैनंदिन कामकाजात ‘एआय’ प्रणालीचा वापर करत आहेत, याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पथकातील डॉ. त्यागी यांनी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, मार्व्हल संस्थेचे प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, ‘‘पालकमंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एआय सिंधुदुर्ग’ ही संकल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात जिल्हा प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जिद्द, चिकाटी आणि प्रशिक्षण घेण्याची तयारी पाहून आनंद झाला. कृषी, पोलिस, आरोग्य, वन, परिवहन आणि जिल्हा प्रशासन या विभागांमध्ये एआय प्रणालीच्या वापरामुळे भविष्यात प्रशासन अधिक वेगवान, पारदर्शक आणि परिणामकारक होईल.’’ त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा बँकिंग क्षेत्रात इतका प्रभावी वापर होत असल्याचे क्वचितच पाहायला मिळते, अशी विशेष टिपणी त्यांनी केली. 
-------
मुख्यमंत्र्यांचे व्हिजन स्विकारून वाटचाल!
या प्रसंगी पालकमंत्री राणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी निती आयोगाच्या टीमचे जिल्हा भेटीबद्दल आभार मानताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासात्मक व्हिजनला स्वीकारून आम्ही सिंधुदुर्गात एआय प्रणालीच्या माध्यमातून प्रशासनात नव्या युगाची सुरुवात केली आहे. नागपूरचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि मार्व्हल ग्रुपच्या सहकार्यामुळे आम्ही अनेक अडचणींवर मात केली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहता भविष्यातील सिंधुदुर्ग नक्कीच वेगळा असणार, असेही पालकमंत्री राणे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

