कणकवलीत हजारापेक्षा अधिक दुबार मतदार
01813
कणकवलीत हजारापेक्षा अधिक दुबार मतदार
सुशांत नाईक ः बनावट मतदारांवरच नगराध्यक्ष ठरणार?
कणकवली, ता. १ : कणकवली नगरपंचायत क्षेत्रात २०० हून अधिक दुबार मतदार असल्याची तक्रार नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. प्रत्यक्षात मात्र कणकवली शहरात १००० हून अधिक दुबार मतदार असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप आज युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज केला. याच शहराबाहेरील, ग्रामीण भागातील बनावट मतदानांवर कणकवलीचा नगराध्यक्ष ठरतो की काय, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचेही ते म्हणाले.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे दुबार मतदार यादी दिल्यानंतर त्यांनी सदर तक्रार यादी ही तहसीलदारांकडे वर्ग केली. कणकवली नगरपंचायत क्षेत्रात नोंदणी असलेल्या यामतदारांची नावे कणकवली, तसेच अन्य तालुक्यांतील ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदार याद्यांमध्येही आहेत. हे दुबार मतदार वगळावेत अथवा त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी आमची मागणी होती. दुबार मतदारांवर कारवाईचे अधिकार तहसील कार्यालयात असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले. त्यानुसार आज आम्ही याबाबत कणकवली तहसीलदारांचे लक्ष वेधले आहे. या दुबार मतदारांवर आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.’’
नाईक म्हणाले, ‘‘कणकवली नगरपंचायत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आमच्या निदर्शनास २०० मतदार दुबार असल्याची बाब लक्षात आली होती. मात्र, ज्यावेळी सर्व प्रभागांतील नागरिकांनी सूचना आणि हरकती नोंदवल्या, त्यावेळी तब्बल १ हजार हून अधिक दुबार मतदार शहरात असल्याची बाब उघडकीस आली. एवढ्या मोठ्या संख्येने दुबार मतदार शहरात असतील तर ते नगराध्यक्ष उमेदवाराचे भवितव्य ठरवू शकतात. किंबहुना नगराध्यक्ष निवडणूक सोपी होण्यासाठीच ग्रामपंचायत क्षेत्रात नोंदणी असलेल्या मतदारांची नावे कणकवली नगरपंचायत क्षेत्रातही ठेवली असावीत, असा संशय आहे.’’
ते म्हणाले, ‘‘दुबार नोंदणी असलेल्या मतदारांना ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत यापैकी एका क्षेत्रातील नाव कायम ठेवावे, असा पर्याय दिला जाणार आहे. त्याबाबत सर्व दुबार मतदारांना निवडणूक विभागाकडून लवकरच पत्र पाठवले जाणार असल्याचे आश्वासन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिले आहे. तसेच दुबार मतदारांनी नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत यापैकी जे क्षेत्र निवडले असेल, ते क्षेत्र कायम ठेवून उर्वरित क्षेत्रातील नाव रद्द केले जाणार असल्याचीही ग्वाही दिली आहे. मात्र, या दुबार मतदारांवर कटाक्षाने लक्ष ठेवणार आहोत. नगरपंचायत निवडणुकीपूर्वी या दुबार मतदारांची कुठल्या तरी एका क्षेत्रातील नोंदणी रद्द न झाल्यास ठाकरे शिवसेनेतर्फे मोठे आंदोलन छेडू.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

