वातावरण बदलाप्रमाणे जगायला तयार व्हा
rat2p1.jpg-
01909
डॉ. प्रशांत परांजपे
इंट्रो
ग्लोबल वॉर्मिंग अर्थात वातावरण बदलाचा परिणाम आता सातत्याने जाणवणार आहे. या बदललेल्या वातावरणाशी सामावून घेऊन आपल्याला स्वतःला बदलणे आणि आपले तसेच निसर्गाचे जगणे सुसह्य करणे ही अत्यावश्यक गोष्ट झाली आहे.
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
---------
वातावरण बदलाप्रमाणे जगायला तयार व्हा
शाळेत असताना निसर्गचक्र शिकवलं जातं. अगदी बाल्यावस्थेतच आपण कसं वागावं याचे धडे प्राथमिक शाळेत दिले जातात. मात्र त्याचा विसर पडला, आणि “मला काय त्याचे?” ही प्रवृत्ती बळावली; तेथेच निसर्ग आणि पृथ्वीच्या अध:पतनाला सुरुवात झाली. यावर्षी कोपलेल्या निसर्गाने सर्वत्र अती पावसाने जगणं नकोसं करून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणलं आणि पाण्याचं महत्त्व पटवून दिलं आहे. कितीही उशिरा पाऊस आला तरी आपण या पडणाऱ्या थेंबाचे महत्त्व जाणून घेतलेलं नाही.
आपण यावर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं का? पडणारा थेंब जमिनीत जिरवला का? पाणी जमिनीत झिरपवण्याचे अनेक उपाय आहेत. त्याचा अभ्यास करून आपण ते अवलंबले का? निसर्गाचा ढासळलेला तोल वाचवण्यासाठी एक तरी प्रयत्न आपण केला का? असे प्रश्न आरशासमोर उभे राहून प्रत्येकाने स्वतःलाच विचारणं आवश्यक आहे.
कोकणचा विचार करता, कोकणची भूमी ही सच्छिद्र खडकांनी बनलेली आहे. या भूमीवर कितीही पाऊस पडला तरी तो टिकून राहत नाही; निचरा होऊन तो समुद्रात मिळतो. अवेळी पावसामुळे महाराष्ट्रात सर्वत्रच शेतकऱ्यांच्या कष्टांवर पाणी पडलं आहे. कापसापासून भातापर्यंत अनेक पिके पावसाने नष्ट झाली आहेत. शेतकरी हताश झाला आहे; त्याला पुन्हा बळ देणं आवश्यक आहे. प्रत्येकाने बदललेल्या परिस्थितीवर मात करून पुढे जाण्यासाठी आता कंबर कसणे गरजेचे आहे. परिस्थिती बदलली, वातावरण बदललं, तर विचारपद्धती, जीवनपद्धती आणि पिकपद्धती बदलणेही अत्यावश्यक झाले आहे. यासाठी सर्वांनी सेंद्रिय शेती (ऑर्गेनिक फार्मिंग) ची कास धरणे गरजेचे आहे. अति रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा कस निघून गेला आहे; त्यात अनियंत्रित आणि अपरिमित पावसामुळे जमीन अधिकच नापीक झाली आहे. भर म्हणून, कोणताही विचार न करता कचरा आणि रासायनिक द्राव्य मिश्रित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्या, नाले, ओहोळ, गटार यांत सोडले जात आहे. कितीही आरडाओरडा झाला तरी दुर्दैवाने हे प्रकार थांबत नाहीत.
पैशाच्या मागे धावताना रासायनिक कंपन्या, रासायनिक खतांचा अति वापर, झटपट पैसा मिळवण्यासाठी भाजीपाल्यातील रासायनिक उत्पादनं, टिकाऊ फळं या सगळ्यामुळे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होत आहे. सुट्टी मिळाली की, जिथे थोडा निसर्ग शिल्लक आहे, तिथे तो पाहायला जातो आणि तिथेच कचरा करून परततो!
प्रत्येक पर्यटनस्थळ आता प्लास्टिक कचऱ्याने गुदमरलेले दिसते. एकेकाळी जिथे निसर्ग संपन्नता होती, तिथे आता प्लास्टिकचा महासागर निर्माण झालेला दिसतो. याला जबाबदार कोण? हा प्रश्न पुन्हा आरशासमोर उभे राहून आपण स्वतःलाच विचारणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी नैसर्गिक आपत्ती आल्यावर शासनावर दोष टाकून “आमचं नुकसान भरून द्या” असं म्हणण्याऐवजी, शेतकऱ्यांना मानसिक बळ देणे, शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, आणि त्यांना स्वबळावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देणे हीच खरी गरज आहे.
कृषी सल्लागार, कृषी विद्यापीठं आणि शासनाचा कृषी विभाग यांनी पर्यायी कृषी उत्पादने कोणती घेता येतील याचे तातडीने मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. एक वेळ अशी येऊ शकते की सर्वत्र सिमेंटची जंगले उभी राहतील; पैसा असेल, पण शेती नसेल; खिशात पैसा असेल पण दुकानात धान्य नसेल. अशी चाहूल लागली आहे. कविवर्य केशवसुतांनी “सावध पुढल्या हाका” असे १८०० च्या दशकातच लिहून ठेवलं आहे, पण वाचतो कोण? समजून घेतो कोण ? म्हणूनच म्हटलं जातं, “वाचाल तर वाचाल.”
आता कोणावर टीका करण्याची वेळ नाही. त्याऐवजी, बदललेल्या परिस्थितीत ताठ मानेने उभे राहण्यासाठी आपलं मन, शरीर आणि निसर्गाचं मन व शरीर हे स्वस्थ आणि स्थिर कसे राहतील, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतांचा वापर, आयुर्वेद व योगविद्या, कचरा साक्षरता, वातावरण बदल यांचा अभ्यास करून त्या पद्धतीने दिनचर्येत बदल करणे, हे काळाची गरज आहे.
आता प्रत्येकाला या बदललेल्या परिस्थितीतच जगावं लागणार आहे. आपल्या राहण्याच्या, खाण्याच्या, पिण्याच्या, फिरण्याच्या, अभ्यासाच्या, वागण्याच्या सर्व पद्धतींमध्ये बदल करावा लागणार आहे. अनेक गोष्टींना मुरड घालण्याची सवय लावावी लागेल. जे स्वस्त असतं ते प्रत्येक वेळी शाश्वत असतंच असं नाही; किंवा जे दिसतं ते तसं नसतं, या जाणिवा मनात ठेवायला हव्यात. एकंदरीत, सारासार विचारबुद्धीला प्रमाण मानून, तारतम्याने वागणं आणि मनातली गोठलेली माणुसकी पुन्हा जागी करणं, ही काळाची गरज आहे. निसर्गाला नतमस्तक व्हा. निसर्गाचे पाईक व्हा. निसर्गाला आपलं म्हणा. निसर्गावर मात करण्याचा यत्किंचितही विचार मनात आणू नका. मानसिक बदल झाला तरच २०५० पर्यंत आपण सुसह्य आयुष्य जगू शकू.
ही धोक्याची घंटा पुन्हा एकदा वाजवत आहे.
(लेखक शाश्वत पर्यावरण विकास या विषयातील डॉक्टर पदवीधर आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

