सकाळ विशेष ः माणूस-वाघ सहजीवनाचे प्रतिक वाघबारस
सकाळ विशेष - लोगो
rat2p7.jpg-
01957
मंडणगड ः रंगरंगोटी करून वाघाच्या रूपात मुलांना सजवले जाते.
rat2p8.jpg
01958
नैसर्गिक रंगाने सजलेले वाघ.
rat2p9.jpg-
01959
वाघबारस साजरी करताना ग्रामस्थ.
rat2p10.jpg-
01955
निसर्गदेवतेला विडे अर्पण करून गाऱ्हाणे घालताना.
rat2p11.jpg-
01956
पूजा करताना ग्रामस्थ
----------
इंट्रो
रानातून घरात पीक आलं की शेतकऱ्याच्या संसाराला नवी झळाळी मिळते. पण त्या समृद्धीच्या पायावर उभं असतं त्याचं पशुधन. बैल, गाई, म्हशी, वासरे, मेंढ्या. शेतीचा प्रत्येक टप्पा त्यांच्या श्रमांशिवाय पूर्णच होत नाही. ओलं रान ओलांडणाऱ्या नांगराच्या पाठीवर बैल असतो, तर दुभत्या गाईच्या दुधात शेतकऱ्याच्या लेकरांच्या जगण्याचा गोडवा दडलेला असतो. त्यामुळे या जनावरांचं रक्षण, त्यांचं स्वास्थ्य आणि त्यांना हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण मिळूदे हेच शेतकऱ्याचं चिंतन असतं. या भावनेतूनच कोकणातील डोंगर दऱ्यांच्या कुशीत शतकानुशतकांपासून जपली गेलेली परंपरा म्हणजे वाघबारस. वसुबारसच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा हा दिवस केवळ धार्मिक विधी किंवा लोककला नाही, तर तो आहे निसर्ग, माणूस आणि पशुधन यांच्या जिवंत नात्याचा उत्सव. सहजीवनाच्या शहाणपणाने भरलेला. यामध्ये भीतीचं रूप श्रद्धेत बदलतं आणि निसर्गाशी सहजीवनाचा संदेश पिढ्यान्पिढ्या वाहत राहतो.
- सचिन माळी, मंडणगड.
--
माणूस-वाघ सहजीवनाचे प्रतीक वाघबारस
निसर्ग, पशुधन पशुपालकातील नात्याचा उत्सव ; आजही कालसुसंगत
कोकणातील वाघबारसच्या परंपरेतून ग्रामीण समाजाची निसर्गाशी असलेली नाळ स्पष्ट दिसते. शेतकरी निसर्गाला शत्रू नव्हे, तर सखा मानतो. वाघ, बिबटे, लांडगे हे त्याच जगाचे घटक आहेत, हे त्याला ठाऊक आहे. म्हणूनच तो प्रार्थना करतो, आमचं आणि तुमचं क्षेत्र वेगळं राहो, पण दोघांचं अस्तित्व टिकून राहो. वाघबारस ही केवळ श्रद्धेची नव्हे, तर पर्यावरणाशी सुसंवाद साधणाऱ्या लोकसंस्कृतीची अभिव्यक्ती आहे. ज्यात प्रथेमागचा आशय; पारंपरिक शेतीव्यवस्था ही केवळ जमिनीशीच नव्हे, तर निसर्गाच्या प्रत्येक घटकाशी निगडित होता. पावसाळ्याच्या अखेरीस पीक हाती येताच शेतकरी वर्षभर निसर्गाने दिलेल्या वरदानाचे स्मरण करतात. याच काळात गुरांना चरण्यासाठी पुन्हा रानात सोडले जाते. जंगलात वाघ, बिबटे, लांडगे यांसारखे हिंस्त्र प्राणी फिरत असल्याने जनावरांच्या सुरक्षेसाठी ग्रामसमूहाच्या सामूहिक प्रार्थनेचा हा दिवस असतो. शेतकरी आपल्या पशुधनाला घरचे सदस्य मानतात. म्हणूनच गुरांना संरक्षण लाभावे, त्यांचे स्वास्थ्य टिकावे, ही प्रार्थना म्हणजे मानव आणि निसर्ग सहअस्तित्वाचे सुंदर प्रतीक होय.
----
रानातील गोठणीवर एकत्रीकरण
वाघबारसच्या आदल्या दिवशीच गावातील गुराखी आणि पुजारी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ आणि थोडे पैसे गोळा करतात. या सामूहिक निधीतून दुसऱ्या दिवशीचा पूजाविधी आणि खेळ यांची तयारी केली जाते. वसुबारसच्या दिवशी सकाळीच गावातील सगळी गुरे एका ठराविक गोठणीवर म्हणजे रानातील मोकळ्या जागेत आणली जातात. तिथे त्यांची पूजा केली जाते. गुरांना हळद कुंकू लावले जाते, त्यांच्या अंगावर फुले उधळली जातात. विडे मांडले जातात. काही ठिकाणी खिरीचा नैवेद्य दाखवला जातो.
----
रंगविलेल्या काठ्या संरक्षणाचे प्रतीक
यानंतर गावातील मुलांना वाघाचे रूप दिले जाते. नदीकाठी दगड उगाळून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांनी त्यांचे अंग सजवले जाते. काही मुले मुखवटे घालतात. त्यानंतर गुराखी आणि शेतकरी नवी काठी रंगवतात. या काठ्या ‘संरक्षणाचे प्रतीक’ म्हणून पूजा करून एकत्र उभ्या केल्या जातात. यानंतर रानभर सुरू होतो वाघांना पळवण्याचा खेळ. सजवलेले वाघ गावाच्या वेशीपर्यंत धावत जातात आणि शेतकरी वाघ रे वाघ रे अशी आरोळी देत त्यांच्या पाठीवर ठेवलेल्या पिशवीतील कडू कारटी फोडतात. या प्रतीकात्मक कृतीतून हिंस्त्र प्राण्यांना गाव आणि पशुधन चरण्याच्या जागेबाहेर पिटाळण्याचा अर्थ व्यक्त होतो. ठार मारण्याचा नव्हे हे महत्वाचे. वाघ वेशीबाहेर गेल्यावर पुन्हा मागे वळून काठ्यांना हात लावून त्या पाणवठ्याकडे वाकवतात. जणू वाघ आता शांत झाला, पाणी प्यायला गेला, आणि मानव प्रकृती यांचे संतुलन पुन्हा प्रस्थापित झाले.
-------
निसर्गाशी संवादाचा प्रगल्भ विचार
निसर्गाशी संवाद साधण्याची मानवी तळमळ या प्रथेत दिसून येते. शेतकरी निसर्गाच्या कोपाने हवालदिल होतो, पण त्याच निसर्गाला तो देवतेसारखे मानतो. तूच आम्हाला अन्न देतोस, पाणी देतोस, जनावरांचे रक्षण कर हीच त्या प्रार्थनेची मूळ भावना. वाघबारस म्हणजे केवळ भीतीवर मात करण्याचा खेळ नाही, तर ती सहजीवनाची शपथ आहे. हिंस्त्र प्राणीही निसर्गचक्राचा भाग आहेत, हे शेतकऱ्यांना ठाऊक असते. म्हणूनच ते वाघांना ठार न करता गावाबाहेर राहण्याची विनंती करतात. आमचे आणि तुमचे क्षेत्र वेगळे राहो, ही वृत्ती आजच्या पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही किती प्रगल्भ आहे हे लक्षात येते.
------
परंपरेचा सामाजिक पैलू
वाघबारसचा दिवस हा गावातील एकत्र येण्याचा दिवस असतो. लहान थोर, स्त्री-पुरुष, शेतकरी गुराखी सगळे सहभागी होतात. सामूहिक श्रम, एकत्र निधी, एकत्र पूजा आणि सामायिक आनंद यामुळे गावाची एकजूट वाढते. या प्रथेतून मुलांनाही संघटन, जबाबदारी आणि निसर्गाशी आदराने वागण्याचा धडा मिळतो. वाघ बनणारी मुले खेळाचा भाग होतात, पण त्यांना हिंस्त्र प्राणी म्हणून नव्हे तर निसर्गाचा घटक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे भीतीऐवजी सन्मानाची भावना मनात रुजते.
------
आधुनिक काळातील स्थिती
काळाच्या ओघात ही प्रथा काही ठिकाणी लोप पावत चालली आहे. आज गुराखी उरलेले नाहीत, पशुधनाचे प्रमाण कमी झाले आहे, आणि अनेक गावांमध्ये जंगलांचा विस्तारही घटला आहे. तरीही मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण परिसरातील अनेक गावे आजही या परंपरेचे जतन करत आहेत. ज्येष्ठ नागरिक सांगतात की पूर्वी वाघबारस साजरी झाली की गावभर सनई ढोल झांज वाजत, मुलांचा वाघांचा खेळ चालत असे आणि सगळे मिळून निसर्गदेवतेला प्रार्थना करत. आजही काही शेतकरी कुटुंबे या दिवशी खास खिरीचा नैवेद्य करून ग्रामदेवता आणि निसर्गदेवतेला अर्पण करतात. गुरे जंगलात सोडली आहेत, त्यांना त्रास देऊ नका अशी प्रार्थना करतात.
-------
निसर्गाशी संघर्ष नव्हे संवाद हवा
वाघबारसची ही लोकपरंपरा केवळ धार्मिक नव्हे तर पर्यावरणस्नेही शहाणपणाचे उदाहरण आहे. जंगलात हिंस्त्र प्राणी असतात, म्हणून त्यांचा नाश करण्याऐवजी त्यांना त्यांच्या अधिवासातच राहू देणे, ही विचारसरणी आजच्या वन्यजीव संवर्धनाच्या तत्त्वांशी सुसंगत आहे. माणूस प्रकृती संघर्ष वाढत असताना या परंपरेचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. निसर्गाशी संघर्ष नको, संवाद हवा. शेतकरी आपल्या मर्यादेत राहून निसर्गाला साद घालतो, आणि त्याच वेळी पशुधनाच्या सुरक्षेसाठी सामूहिक प्रयत्न करतो.
कोकणातील अशा लोकपरंपरा म्हणजे या भूमीचा संस्कृतीचा वारसा आहेत. वाघबारस हे कोकणातील भय आणि श्रद्धा, प्रार्थना आणि उत्सव, निसर्ग आणि मानव यांच्यातील ताणतणावांचे संतुलन जपणारे एक प्रतीक आहे. आजच्या पिढीने ही परंपरा केवळ खेळ म्हणून नव्हे, तर पर्यावरणाचा धडा देणारी लोकसंस्कृती म्हणून पाहणे आवश्यक आहे.
-------
कोकणातील जीवनतत्त्वाचे दर्शन
वाघबारस ही एक साधी लोकरीती वाटू शकते; पण तिच्यामागे आहे शतकानुशतकांचे शेतकरी शहाणपण. निसर्गाशी संघर्ष न करता त्याच्याशी संवाद साधणारा, पशुधनाला कुटुंब मानणारा आणि हिंस्त्र प्राण्यांनाही त्यांच्या हक्काच्या जागेत सन्मान देणारा हा उत्सव. कोकणातील जीवनतत्त्वाचे दर्शन घडवतो. आधुनिकतेच्या लाटेत अनेक लोकरीती हरवत आहेत, तरी वाघबारसची भावना जपणाऱ्या गावकऱ्यांमुळे निसर्गाशी मानवी नात्याची दोरी अजूनही टिकून आहे, आणि तोच या परंपरेचा खरा संदेश आहे. आज पर्यावरणरक्षण, पर्यावरणस्नेही जगणं हे परवलीचे शब्द झाले आहेत. शतकानुशतके ही समज येथील लोकांना होती.
एकेकाळी कोकणातील प्रत्येक गावात उत्साहाने साजरी होणारी वाघबारस ही पारंपरिक शेतीसंस्कृतीशी निगडित प्रथा आज विस्मृतीत चालली आहे. कालांतराने शेतीतील मजुरी कमी होणे, तरुणांचे शहरांकडे स्थलांतर, तसेच यांत्रिक शेतीच्या वाढत्या वापरामुळे जनावरांचे प्रमाण घटले आहे. परिणामी अनेक कोकणी गावे ओसाड झाली असून वाघबारस साजरी करण्याची परंपरा तुटक स्वरूपातच काही ठिकाणी टिकून आहे. परंपरेचा हा लोप ग्रामीण संस्कृतीतील बदलाचे जिवंत प्रतीक ठरत आहे. प्रथा लोप पावत असली तरी आज बिबट्यांचा वावर कोकणात गावागावात वाढला आहे. अशावेळी बिबट्यांसोबत सहजीवन महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे प्रथा लोप पावत असली तरी त्याचा आशय आजही तितका कालसुसंगत आहे.
--------
सह्याद्रीच्या पाड्यांतील जपलेली श्रद्धा
रत्नागिरी, सातारा सीमेवरील कुंभार्ली घाट परिसरात असंख्य आदिवासी पाडे, धनगर वाडे आणि वनगावं आहेत. या भागात लोक आजही वाघबारस हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. या दिवशी गाई गुरांना, मेंढ्यांना आणि शेळ्यांना स्नान घालून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्या अंगावर हळद कुंकवाचं लेप लावतात, ओवाळणी केली जाते आणि भाकरी, भात किंवा दुधाचे पदार्थ अर्पण केले जातात. या विधीमागे एक सुंदर भावना आहे. निसर्गाशी सलोखा राखण्याची. जंगलात राहणारा वाघ हा देवतेचा दूत मानला जातो. म्हणूनच आदिवासी लोक “वाघा, आमच्या जनावरांना हात लावू नकोस” अशी प्रार्थना करत त्याचं पूजन करतात. ही पूजा भितीतून नाही, तर निसर्गाशी संवाद साधणारी श्रद्धा आहे.
-------
मंडणगडचा कोकणी वारसा
कोकणातल्या मंडणगड तालुक्यातील दुर्गवाडी, पाले, पालेकोंड, बोरघर आणि आसपासच्या गावांत ही परंपरा आजही टिकून आहे. या भागातील लोक वाघदेव किंवा वनदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तीची पूजा करतात. वाघबारसच्या दिवशी गावातील लोक एकत्र येऊन पारंपरिक गाणी नाचांनी वातावरण रंगवतात. मंडणगडमध्ये आजही कोकण संस्कृतीचा अस्सल ठेवा दिसतो. काळाच्या ओघात, रोजगाराच्या शोधात झालेल्या स्थलांतरामुळे, तसेच आधुनिक जीवनशैलीच्या प्रभावामुळे अनेक गावांत ही परंपरा हळूहळू खंडित होत चालली आहे. मात्र ज्या गावांनी अजूनही या सणाला आपल्या संस्काराचा भाग मानले आहे, तेथे आजही वाघबारस साजरी करण्याचा तोच उत्साह आणि श्रद्धा दिसते.
चौकट
दृष्टिक्षेपात...
संघटित गावांतून जोपासना
स्थलांतरामुळे शेती क्षेत्रात घट
मनुष्यबळ कमी झाल्याने परंपरा खंडित
फळबाग लागवड वाढल्याने मोकाट गुरे कमी
दुग्ध व्यवसायामुळे दुधाळ जनावरे दावणीला
चौकट
जंगलाशी आपली नाळ जपण्याचा एक संकल्प !
वन, जल आणि माणूस यांचं अतूट नातं जपणारा, पर्यावरणपूरक असा आदिवासी सण वाघबारस आता पुन्हा नव्या रूपात फुलू लागला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या धनगरपाड्यांवर गेल्या सात वर्षांपासून सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्था या सणाच्या पुनर्जागरणाचा उपक्रम सातत्याने राबवत आहे. शहरांकडे रोजगारासाठी वळलेली तरुण पिढी आणि गावात उरलेली वयोवृद्ध मंडळी, या दरम्यान हरवत चाललेला हा सण पुन्हा गावकुसात आणण्याचा संस्थेचा प्रयत्न पर्यावरण जागरूकतेचं एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
वाघबारस हा सण म्हणजे जंगलाशी, वन्यजीवांशी आणि मानवाशी असलेला भावनिक दुवा. परंपरेनं या दिवशी गावकरी वाघाला आणि जंगलातील प्राण्यांना अभिवादन करून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. पाण्याचे स्रोत, वृक्ष, आणि शेतीसाठी जंगलाची देणं याबद्दल या सणाद्वारे स्मरण केलं जातं. मात्र आधुनिकतेच्या लाटेत अनेक भागांतून हा सण लोप पावला होता.
सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेचे कार्यकर्ते गेल्या सात वर्षांपासून कुंभार्ली घाटातील धनगरपाड्यांवर फिरून ग्रामस्थांना वाघबारस सणाचं महत्त्व पटवून देत, त्यांना सहभागी करून घेत हा सण पुनरुज्जीवीत करत आहेत. या सणात गावातील, पाड्यावरील लहान मुलांना वाघासारखं रंगवून जंगलांकडे दप्टण्याचे प्रतीकात्मक कार्यक्रम केले जातात. या सणात तांदळाच्या खिरीला मोठा मान असतो. पारंपरिक गाणी, तसेच वनदेवतेची आणि वाघोबाची पूजा (ज्यात वाघोबाला वस्तीचे व गुरांचे रक्षण करण्याबाबत साकडं घातलं जातं) यांचा समावेश करून स्थानिकांना पुन्हा या संस्कृतीशी जोडले जात आहे.
अरणी प्रभुलकर आणि सदफ कडवेकर यांच्या म्हणण्यानुसार, वाघबारस हा फक्त सण नाही; तो जंगलाशी असलेली आपली नाळ जपण्याचा एक संकल्प आहे. या सणातून पुढील पिढ्यांपर्यंत निसर्गाबद्दल आदर आणि जिव्हाळा पोहोचवण्याचा त्यांचा निरपेक्ष प्रयत्न आहे. या उपक्रमातून स्थानिकांनी वने व वन्यजीव संवर्धन, वणवा-मुक्ती उपक्रम, तसेच चोरट्या शिकारींना आळा घालण्याचे व्रत स्वीकारले आहे. सणाच्या निमित्ताने दरवर्षी वृक्षारोपण, पाणवठ्यांची स्वच्छता आणि स्थानिक जैवविविधतेचे सर्वेक्षण अशा क्रियाकलापांनाही चालना मिळते. जंगल आणि माणूस यांच्यातील सहजीवन पुन्हा फुलवण्यासाठी वाघबारससारखे सण एक पूल ठरू शकतात, असा विश्वास त्यांचा आहे. या चळवळीमुळे कुंभार्ली घाटातील गावांमध्ये पर्यावरण-जाणीव आणि पारंपरिक वारसा पुन्हा रुजताना दिसत आहे.
------
कोट
शेतीची कामे पूर्णपणे आवरली की गुरे मोकाट सोडली जातात याला आमच्याकडे हळवी खाववणे म्हणतात. एकदा हळवी खाववली की पुन्हा पुढच्या पावसात पेरणी होईपर्यंत गुरे राखायला कोण जात नाही. सकाळी गोठ्यातून सोडून देतात आणि संध्याकाळी दाराजवळ आली की बांधतात. हे पूर्वपरंपरागत चालत आले आहे.
- प्रितेश कदम, गुडेघर.
-----
कोट
या परंपरेतून मानवाचं निसर्गाशी व वन्य प्राण्यांशी असलेल्या नात्याची जपवणूक केली जाते. शेतकऱ्याच्या पशुधनाचे रक्षण निसर्गाने व ग्रामदैवताने करावे याच साकडं घालत व पूजा करून निसर्गाची आराधना करीत आजही आम्ही वाघबारस साजरी करतो.
- सुधीर गोरीवले, ग्रामस्थ दुर्गवाडी.
--------
कोट
या दिवशी रानात खिरीचा नैवद्य बनवून तो निसर्गदेवाला अर्पण केला जातो. विडे मांडून त्याची पूजा केली जाते. यानंतर वाघ रुपातील मुलांच्या हाती देवून तो धावत जावून जंगल भागात देवासाठी अर्पण केला जातो. आजही ही पूर्वपरंपरागत चालत आलेली वाघबारस सुरू आहे.
- रमेश दुर्गवले, ग्रामस्थ, मंडणगड
----------
कोट
शेती ओसाड पडून पशुधन कमी झाल्याने अनेक गावातून वाघबारस परंपरा खंडित झाली. ऐंशीच्या नव्वदच्या दशकात या दिवशी गावोगावच्या गोठण गाईगुरांनी गजबजून जायच्या. तसेच प्रातिनिधिक धावत येणाऱ्या वाघांची दहशत असायची. त्यांना वेशीबाहेर पळवून लावण्याचा खेळ चांगलाच रंगलेला असायचा. निसर्ग आणि माणूस यांच्यातील सहजीवन अधोरेखित करणारा हा सण कालानुरूप लोप पावत चालला आहे.
- उदय जाधव, बोरघर ग्रामस्थ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

