‘युथ आयकॉन’ माझ्यासाठी अभिमानास्पद
01966
‘युथ आयकॉन’ माझ्यासाठी अभिमानास्पद
जिल्हाधिकारी ः ‘कोकण एनजीओ इंडिया’तर्फे सिंधुदुर्गनगरीत गौरव
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः ‘‘कोकण संस्थेचा ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ हा सन्मान मिळणं माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भावनिक बाब आहे. माझ्या प्रवासात आलेल्या संघर्षांना आणि प्रत्येक टप्प्यावर दिलेल्या परीक्षांना या पुरस्काराच्या रूपाने मिळालेली दाद, ही माझ्या केवळ वैयक्तिक नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या प्रेरणेची कहाणी आहे,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडियातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी धोडमिसे यांना ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ परस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री परशुराम गंगावणे आणि कोकण एनजीओ इंडियाचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते दिला. या कार्यक्रमाला व्यवस्थापक प्रथमेश सावंत, देवानंद कुबल, गौरी अडेलकर, समीर शिर्के, वैष्णवी म्हाडगूत, शशिकांत कसले, अवंती गवस, रुचा पेडणेकर, अमोल गुरम आणि पद्माकर शेटकर आदी उपस्थित होते.
या सन्मानाबद्दल पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी त्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, धोडमिसे यांचा प्रवास हा सर्व युवकांसाठी प्रेरणादायी आहे. विशेषतः जे विद्यार्थी एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी त्यांची वाटचाल ही एक उज्ज्वल आदर्श ठरेल. श्रीमती धोडमिसे यांनी या प्रसंगी कोकण एनजीओ इंडिया संस्था गेल्या १४ वर्षांपासून समाजाच्या उन्नतीसाठी करत असलेल्या कार्याचं विशेष कौतुक केलं आणि या कार्यात सातत्य राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
---
ध्येय ठरवा, झपाटून काम करा!
आपल्या भावना व्यक्त करताना आयएएस धोडमिसे पुढे म्हणाल्या, ‘‘मी चौथ्या प्रयत्नात ‘आयएएस’ झाले. मात्र, त्यामागे असंख्य अपयश, निराशा, आत्मपरीक्षण आणि न थांबता चालणारी मेहनत होती. आजच्या तरुणांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, अपयश हे यशाचं पहिले पाऊल आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचं ध्येय ठरवा आणि त्यासाठी झपाटून काम करा. पेटून उठा, ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

