कल्पकतेतून अंगणात साकारला ‘किल्ले जंजिरे सिंधुदुर्ग’
01742
कल्पकतेतून अंगणात साकारला ‘किल्ले जंजिरे सिंधुदुर्ग’
मळगावच्या ज्ञानेश्वर राणेंची कला; पर्यावरणपूरक कलाकुसर ठरली प्रेरणादायी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः मळगाव येथील इतिहास व किल्ले संस्कृतीप्रेमी ज्ञानेश्वर राणे या तरुणाने इतिहास आणि संस्कृतीला एकत्र आणत आपल्या घराच्या अंगणात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या किल्ले जंजिरे सिंधुदुर्गची सुंदर व आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. इतिहासाची ओढ, शिवकालीन किल्ल्यांबद्दलचे प्रेम व जिव्हाळा आणि हातातील कौशल्य यांच्या जोरावर ज्ञानेश्वर याने केलेल्या या कलाकसुरीचे सर्वत्र कौतुक होत असून गड-किल्ले संवर्धनाचा संदेश देणारा पर्यावरणपूरक उपक्रम ठरला आहे.
ज्ञानेश्वर राणे हे इतिहासप्रेमी असून मळगाव येथील अष्टविनायक कला, क्रीडा मंडळाचे सदस्य आहेत. मंडळातर्फे ते विविध ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. तसेच ते दुर्ग मावळा व दुर्ग रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून संवर्धन कार्यात सहभागी होत असतात. ते स्वतः ऐतिहासिक वस्तूंचे संग्राहक आहेत. तसेच शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन, शालेय मुलांना शिव इतिहासावर व्याख्यान आदी उपक्रम राबवत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ‘अमृत’ नावाच्या (महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेने ‘अमृत दुर्गोत्सव-२०२५’ अंतर्गत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राणे यांनी किल्ले जंजिरे सिंधुदुर्गची प्रतिकृती साकारली आहे. किल्ले बांधणीची पारंपरिक शैली व जिवंत भासणारा ठेवा टिकवता ही प्रतिकृती बांधताना राणे यांनी, माती, शेण, चुना आदी पूर्णपणे पर्यावरणपूरक नैसर्गिक वस्तूंचा उपयोग करून किल्ल्याची जुनी, पारंपरिक बांधकाम शैली जिवंत केली आहे.
प्रत्यक्ष सिंधुदुर्ग किल्ल्यावरील प्रमुख बांधकामे व महत्त्वाची स्थळे अत्यंत बारकाईने या प्रतिकृतीत उभी केलेली दिसतात. यामध्ये किल्ल्यावरील भव्य महाद्वार, मजबूत तटबंदी, चुना साठवण्याचे हौद, शिवरायांच्या डाव्या पायाचा व उजव्या हाताचा ठसा, शिवराजेश्वर मंदिर, झेंडा बुरुज, भगवती मंदिर, गुप्त दरवाजा, दूध बांव, साखर बांव, दही बांव, तुळशी वृंदावन, जरीमरी मंदिर, महापुरुष मंदिर, चुन्याचा घाणा, बुरुजातील गणपती, महाद्वारासमोरील हनुमान, नगारखाना, महादेव मंदिर व त्यातील विहीर, तटबंदीतून खाली जाणारा मार्ग, पहाऱ्याची खोली, तटबंदीतील खोली व टेहळणी बुरुज आदी सर्व वास्तू बारकाईने या किल्ल्याच्या प्रतिकृतीमध्ये राणे यांनी दाखविली आहेत. केवळ किल्ल्याची प्रतिकृतीच नव्हे, तर त्याची ऐतिहासिक रचना, वास्तूंची जागा यावर विशेष लक्ष देऊन ही प्रतिकृती तयार केली आहे. स्थानिक नागरिकांनी व इतिहासप्रेमींनी राणे यांच्या या कलाकसुरीची प्रशंसा करत कौतुक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

