निसर्गकाव्यांचा शतकानंतरही सुगंध
02228
निसर्गकाव्यांचा शतकानंतरही सुगंध
सतीश लळीत ः ओरोसमध्ये ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः बालकविता, निसर्गकविता आणि गूढगंभीर अर्थवाही कविता अशा काव्यांच्या विविध प्रकारात बालकवींनी अत्यंत ताकदीने स्वच्छंद विहार केला. अवघे २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या विलक्षण प्रतिभावान कवीचे गारुड त्यांच्या निधनाला शतक उलटले तरी आजही टिकून आहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी येथे केले.
‘घुंगुरकाठी’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या आठव्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते. दीड तासाहून अधिक वेळ हा कार्यक्रम चालला. येथील दत्तराज सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ हा कार्यक्रम झाला. मालवणी बोलीला प्रतिष्ठा मिळवून देणारे नाटककार ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात प्रिया आजगावकर, मनोहर सरमळकर, डॉ. सई लळीत, प्रगती पाताडे, वैदेही आरोंदेकर, नम्रता रासम, अपर्णा जोशी, ॲड. सुधीर गोठणकर यांनी सहभाग घेतला.
बालकवींच्या काव्यविषयक कारकिर्दीचा आढावा घेताना श्री. लळीत म्हणाले, ‘‘१९०७ मध्ये जळगाव येथे ‘काव्यरत्नावलीकार’ नानासाहेब फडणीस यांनी पहिले कविसंमेलन आयोजित केले. त्यावेळच्या दिग्गज कवींच्या उपस्थितीत झालेल्या या संमेलनात बालकवींनी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सादर केलेल्या कवितेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. श्री. फडणीस यांनी त्यांना तेथेच ‘बालकवी’ ही पदवी जाहीर केली आणि संमेलनाध्यक्ष कर्नल का. र. कीर्तिकर यांच्याहस्ते त्यांना प्रदान केली. बालकवींना निसर्गकवी म्हणून ओळखले जाते. मात्र, उत्तम अशा बालकविता आणि निसर्गकवितांबरोबरच त्यांनी ‘औदुंबर’सारखी गूढकविता लिहिली. ‘आनंदी आनंद गडे’ किंवा ‘श्रावणमास’ सारख्या आनंदी कवितांसह ‘उदासिनता’, ‘पारव्यास’, ‘दुबळे तारु’, ‘शून्य मनाचा घुमट’ अशा खिन्नता आणि निराशेने भरलेल्या त्यांच्या कविताही अजरामर झाल्या. कल्पनांचे सहजपण, रचनेतील सरलता आणि वर्णमाधुर्य ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती.’’
डॉ. सई लळीत यांनी बालकवी आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्या नात्याच्या गहिऱ्या संबंधांची माहिती दिली. बालकवींचे पालनपोषण रेव्हरंड ना. वा. टिळक आणि लक्ष्मीबाईंनी केले. अतिशय हुशार; मात्र तितकेच खोडकर असलेले बालकवी लक्ष्मीबाईंच्या कशा खोड्या काढीत, याचे वर्णन त्यांनी अनेक उदाहरणांनी केले. मनोहर सरमळकर यांनी ‘औदुंबर’ कविता सादर करून एक निसर्गकविता या अंगाने तिचे रसग्रहण केले. ॲड. सुधीर गोठणकर यांनी ‘औदुंबर’ या निसर्गकविता वाटणाऱ्या या गुढ कवितेचा आध्यात्मिक अर्थ उलगडून दाखवला. वरवर पाहता ही निसर्गकविता वाटली तरी निसर्गाच्या रुपकातून बालकवींनी जीवनविषयक तत्वचिंतन कमीत कमी शब्दात मांडले आहे, असे ते म्हणाले. वैदेही आरोंदेकर यांनी ‘घरटे’ या बालकवितेचे रसग्रहण केले. घरटे नष्ट झालेली छोटीशी चिमणी पोपटाच्या पिंजऱ्याचे आमिष नाकारुन स्वातंत्र्य निवडते, असे त्या म्हणाल्या. प्रगती पाताडे यांनी बालकवींच्या ‘उदासीनता’ कवितेचे वाचन केले. प्रिया आजगावकर यांनी ‘आनंदी आनंद गडे’ तर अपर्णा जोशी यांनी ‘श्रावणमास’ ही कविता सादर केली.
---------------
‘बालकवी’ हे मराठी कवितेला पडलेले स्वप्न
नम्रता रासम यांनी बालकवी हे मराठी कवितेला पडलेले स्वप्न होते, असे सांगून बालकवी हे निसर्गाशी तादात्म्य साधलेले प्रतिभावान कवी होते. सहजसोप्या निरागस बालकवितांबरोबरच त्यांनी भयानकतेचा अनुभवही शब्दबद्ध केला, असे सांगितले. बालकवींच्या अनेक कवितांचा आढावा त्यांनी घेतला व त्यामधील शब्दसामर्थ्य आणि अर्थ उलगडून दाखवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

