सिंधुदुर्गात परीक्षा केंद्र नसणे शरमेची बाब
swt41.jpg 
02344
सिंधुदुर्गनगरीः येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना युवासेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
सिंधुदुर्गात परीक्षा केंद्र नसणे शरमेची बाब
युवासेनेचे आरोपः जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ः सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील पहिला एआय जिल्हा म्हणून गौरवला गेला असला, तरी साध्या शासकीय परीक्षा केंद्रासाठीही जिल्ह्यात सुविधा नसणे ही अत्यंत शरमेची बाब आहे, असा आरोप युवासेनेने केला आहे. या संदर्भात युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा ‘पहिला एआय जिल्हा’ ठरला असला, तरी येथील युवकांना विविध शासकीय व स्पर्धा परीक्षा देण्यासाठी परजिल्ह्यात जावे लागते. त्यामुळे त्यांना प्रवास व निवासाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो. जिल्ह्यात भोसले पॉलिटेक्निक, एमआयटीएम (MITM) यांसारख्या आयटी संस्थांच्या सुविधा असताना, येथे परीक्षा केंद्र मिळत नाही हे दुर्दैवी आहे, असेही युवासेनेने नमूद केले. सध्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या भरती परीक्षांमध्ये सिंधुदुर्ग हा पहिल्या पसंतीचा पर्याय असला तरी, उमेदवारांना इतर जिल्ह्यांतील केंद्रांवर परीक्षा द्यावी लागत आहे. जिल्ह्यातील राज्यकर्ते केवळ निवडणुकीच्या काळातच दिसतात, अशी टीकाही युवासेनेने केली. युवासेना कायम युवकांच्या पाठीशी उभी आहे. सर्व शासकीय आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातच व्हावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख योगेश धुरी, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, मंदार कोठावळे उपस्थित होते.

