लांजा ः भरपाई न दिल्यास गुरुवारी महामार्गाचे काम बंद पाडू

लांजा ः भरपाई न दिल्यास गुरुवारी महामार्गाचे काम बंद पाडू

Published on

rat4p10.jpg
02371
लांजाः तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांच्यासमोर आक्रमकपणे भुमिका मांडताना नुकसानग्रस्त नागरिक.
-----------
भरपाई न दिल्यास उद्या महामार्गाचे काम बंद पाडू
लांजातील नागरिकांचा इशारा; तहसील कार्यालयात बैठक
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ४ ः मुसळधार पावसामुळे आणि महामार्ग ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे लांजा बाजारपेठेतील नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांना महामार्ग ठेकेदार कंपनी नुकसान भरपाई देणार होती; मात्र त्या आश्वासनावर घुमजाव केल्यामुळे नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत ठेकेदार कंपनी प्रतिनिधीला तहसीलदार कार्यालयातच धारेवर धरले. येत्या दोन दिवसांत नुकसान भरपाई न मिळाल्यास गुरूवारी महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा दिला आहे.
मुसळधार पाऊस पडल्यामुळे १ नोव्हेंबरला शहरातील महामार्गावर श्रीराम पुलाजवळील वहाळातील पाणी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तुंबले. ते पाणी आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या सहा महिन्यातील ही चौथी घटना आहे. तरीही ठेकेदार कंपनीने या संदर्भात वेळोवेळी निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करत नुकसान भरपाईची मागणी केली. या वेळी नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीकडून नागरिकांना दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला असता ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीने घुमजाव केला. त्यामुळे आक्रमक नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावून त्याला धारेवर धरण्यात आले. त्या वेळी निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेवेळी ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी नरेश सितलानी यांच्यावर नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे नागरिकांचा पारा चढला. नागरिकांनी ठेकेदार कंपनीला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे तसेच नुकसान भरपाई ५ नोव्हेंबरपर्यंत मिळाली नाही तर ६ नोव्हेंबरला महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा दिला आहे.
तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला राजेश राणे, प्रकाश लांजेकर, अभिजित राजेशिर्के, पंढरीनाथ मायशेट्ये, बाबा धावणे, मंगेश लांजेकर, सचिन लिंगायत, सुरेश करंबळे, सलमान देवानी, मोहम्मद देवानी, मुकरम देवानी, अनिकेत शेट्ये, राजेश भडेकर, नौशाद नेवरेकर, साहिल इसानी, वसीम मुजावर, अब्दुलरहेमान मुजावर, मोहन तोडकरी, बाबू गुरव, रिजवान इसानी आदी उपस्थित होते.

चौकट
आमदार सामंतांचे आश्वासन
नागरिकांनी आमदार किरण सामंत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. या वेळी आमदार सामंत यांनी मी मुंबईत असून, दोन दिवसांत लांजात येणार आहे. ठेकेदार कंपनीने आश्वासन दिल्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली नाही तर संबंधितांवर कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com