कासार्डेतील येरम कुटुंबीयास सुरक्षा विमा योजनेचा लाभ
02403
कासार्डेतील येरम कुटुंबीयास
सुरक्षा विमा योजनेचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ४ ः केवळ २० रुपयांच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेतल्याने कासार्डे येथील सतीश येरम यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. हा लाभ मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कासार्डेचे व्यवस्थापक सागर साटम यांनी विशेष प्रयत्न केले.
कासार्डे-नागसावंतवाडी येथील सत्यविजय धोंडू येरम यांचा जुलैत घराजवळील झाडावरून पडून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच शाखा व्यवस्थापक सागर साटम यांनी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला. सत्यविजय येरम यांचे खाते कासार्डे शाखेत असल्याचे लक्षात आल्यानंतर साटम यांनी त्यांची पत्नी सुवासिनी येरम व मुलगा सतीश येरम यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. केवळ तीन महिन्यांच्या कालावधीतच दोन लाख रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली. या मदतीमुळे येरम कुटुंबाला आर्थिक दिलासा मिळाला आहे. यावेळी धनादेश सुपूर्द कार्यक्रमात शाखा व्यवस्थापक सागर साटम, वंदना राणे, अर्पणा गुरव, प्रशांत परब आदी उपस्थित होते.

