अवकाळी पावसामुळे शेतकरी-बागायतदार उद्धस्त
अवकाळीमुळे शेतकरी-बागायतदार उद्ध्वस्त
भातशेतीचे नुकसान : हवामान अनुकूल नसल्याने चिंता
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार अवकाळी पावसामुळे हवालदिल झाले आहेत. नुकतीच कापणीला आलेली भातशेती पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त केली असून, हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवडाभरात पडणाऱ्या सरींमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, काही ठिकाणी भाताचे रोप पूर्णपणे चिखलात तुटून गेले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, १ नोव्हेंबरच्या पावसात शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून, येत्या काही दिवसांत अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी दिली. कोकणातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने वर्षभर पुरेल इतका तांदूळ मिळवण्यासाठी भातशेती करतात; मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने ९० टक्क्यांपर्यंत नुकसान केले आहे. आता भातानंतर घेण्यात येणारी पावटा, तूर, कडवा आदी पिकांची पेरणीही हवामान अनुकूल नसल्याने धोक्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी कोकणातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्यांवर वेळ न घालवता थेट ओला दुष्काळ घोषित करून सर्व शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. यापूर्वीही सप्टेंबर २०२५ मध्ये तालुक्यातील ४५ गावांतील २४५ शेतकऱ्यांचे जवळपास ४.८८ लाख रुपयांचे नुकसान नोंदवले गेले होते. तरीही, शासनाकडून कोकणाला केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले. या वेळी तरी शासन आणि लोकप्रतिनिधींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
----
कोट
गेल्या पंधरा दिवसांच्या पावसामुळे कापलेली भातशेती चिखलात सडली आहे. या संकटातून सावरणे शेतकऱ्यांसाठी कठीण असून, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी.
- वहाब सेन, शेतकरी, आष्टी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

