तुरळ मराठवाडीत वाघबारस साजरी
-rat५p९.jpg-
२५O०२५८५
संगमेश्वर ः तुरळ मराठवाडीत वाघबारस साजरी केली.
(छाया ः सचिन यादव, संगमेश्वर)
---
संगमेश्वरात खेळ-पूजा-श्रद्धेचा वाघबारस सोहळा
पशुधनाच्या रक्षणासाठी निसर्गदेवतेची प्रार्थना ; अनेक वर्षाची परंपरा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ ः रानातील शेतपिक कापून घरी आणल्यानंतर शेतकरी आपले पशुधन चरण्यासाठी मोकळे सोडतात. हिंस्र श्वापदांपासून पशुधनाचे संरक्षण व्हावे यासाठी कोकणात वाघबारस साजरी केली जाते. पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे संगमेश्वर तालुक्यात गावोगावी शेतकऱ्यांनी निसर्गदेवतेची आराधना करून पशुधनाचे रक्षण करण्याची निसर्गाला प्रार्थना करण्यात आली.
तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी ५ नोव्हेंबरला मोठ्या श्रद्धेने तालुक्यातील अनेक गावांतून वाघबारस ही परंपरा जोपासण्यात आली. काळाच्या ओघात ही प्रथा लोप पावत असली तरीही ग्रामीण भागात आजही तेवढ्याच आस्थेने जपली जाते. ग्रामीण भागात बिबटे आढळून येतात. पूर्वी बहुसंख्य शेतकऱ्यांकडे पशुधन असल्याने निगराणीसाठी गुराखी असत. काळाच्या ओघात पाळीव जनावरांशी निगडित असणारे पारंपरिक कार्यक्रम विस्मरणात गेले असले तरी ही प्रथा आजही जपली जाते. वाघबारसच्या आदल्या दिवशी गुराखी, पुजारी गावातील प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करण्यात आले. वाघबारसला गावातील पशुधन रानातील एका गोठणीवर एकत्र आणण्यात आले. नदीतील दगड उगाळून रंगरंगोटी करून मुलांना वाघ म्हणून सजवले गेले. गुराखी, शेतकऱ्यांनी नवीन काठीला रंगवले. सर्व काठ्या एकत्रित एका ठिकाणी उभ्या करून पूजा करण्यात येते. सजवलेल्या वाघांना पळायला लावून त्यांच्या पाठीवर पिशवीत जमवून आणलेली कडू कारटी शेतकऱ्यांनी आरोळी देत फेकून फोडली. वाघ रे वाघ रे, म्हणत या प्रतिकात्मक वाघांना वेशीच्या बाहेर पळवून लावण्यात आले. वेस ओलांडल्यानंतर पुन्हा माघारी फिरून वाघ धावत येऊन त्या काठ्यांना हाताने धक्का मारून खाली पाडत पाणवठ्याकडे पाणी पिण्यासाठी निघून जातात, असा खेळ रंगला. परंपरेप्रमाणे शेतकऱ्यांनी खिरीचा नैवेद्य दाखवून ग्रामदेवता व निसर्गाला गुरे आता चरण्यासाठी जंगलात फिरणार आहेत तर तू त्यांना त्रास देऊ नको, अशी हिंस्रप्राण्यांना प्रार्थना करतात.
----
कोट
परंपरेतून मानवाचं निसर्गाशी आणि वन्यप्राण्यांशी असलेल्या नात्याची जपणूक केली जाते. शेतकऱ्याच्या पशुधनाचे रक्षण निसर्गाने व ग्रामदैवताने करावे, याचं साकडं घालत व पूजा करून निसर्गाची आराधना करत वाघबारस साजरी केली जाते.
- एकनाथ बेटकर, ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

