फॅटी लिव्हर एक मूक महासाथ
लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(३१ ऑक्टोबर टुडे ४)
सध्या सर्व जगात व परिणामी भारतातही फॅटी लिव्हर ही एक मोठी सार्वजनिक आरोग्यसमस्या बनली आहे. सर्वसाधारणतः एक तृतीयांश प्रौढ लोकांमध्ये फॅटी लिव्हरचा प्रादुर्भाव आजकाल आढळून येतो; परंतु त्याचा आरोग्यावर लगेच काहीच उत्पात दिसत नसल्यामुळे सर्वसाधारण व्यक्ती याबद्दल अनभिज्ञ असते. ही समस्या पुढे वाढत जाऊन लिव्हर पूर्ण बाद होऊन लिव्हर ट्रान्सप्लांटचे एक महत्त्वाचे कारण बनत चालले आहे तसेच लिव्हर कॅन्सर व हृदयरोग होण्यासही फॅटी लिव्हर कारणीभूत ठरत आहे.
- rat६p९.jpg-
25O02737
- डॉ. सुनील कोतकुंडे
---
फॅटी लिव्हर एक मूक महासाथ
फॅटी लिव्हरसोबतीने येणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा व अतिरिक्त कोलेस्टेरॉलमुळे शरीरातील गुंतागुंत वाढत जाते व याचा एकत्रित परिणाम रुग्णाला परिणामी, कुटुंबाला व त्यामुळे येणाऱ्या आजारांचा भार व कमी होणारे आयुर्मान यामुळे याबद्दल जाणीवजागृती कळीची ठरते.
* फॅटी लिव्हरची कारणे
- आहारसंस्कृती ः आपल्या भारतीयांचा पारंपरिक आहार शाकाहारी व कमी प्रथिनांचा असतो. यामुळे रक्तातील साखर लगेच वाढते व परत भूक लवकर लागते. आपल्या आहारात बऱ्याच प्रमाणात स्टार्चफूड जसे पांढरा तांदूळ, मैदा असतो ज्यात फायबर नसते. परिणामी, पोट भरल्याची जाणीव लवकर होत नाही व चार घास जास्त खाल्ले जातात तसेच आपल्या आहारात अतिरिक्त साखरेचा वापर जसे मिठाई, एनर्जी ड्रिंक व चहा-कॉफीचे प्रमाण बरेच वाढले आहे. या अतिरिक्त साखरेची शरीरात साठवणूक करण्यासाठी लिव्हर साखरेचे रूपांतर चरबीत करते. आजच्या सेलेब्रेशनच्या जगात गोड आणि तळलेले पदार्थ जागोजागी उपलब्ध आहेत व बाहेर खाण्याची संस्कृती वाढली आहे. स्विगी व झोमॅटोमुळे घरात अन्न शिजवणे कमी होत आहे व कुठेही, कधीही, कितीही खाणे वाढलं आहे. या सगळ्या उष्मांकांची साठवणूक लिव्हर चरबी म्हणून करत असते.
*जनुकीय कारणे ः दक्षिण आशियातील लोकांच्या जनुकीय रचनेत काही वेगळेपण आहे. ज्यामुळे आपल्याकडे फॅटी लिव्हरचे जास्त प्रमाण आढळून येते. कारण, उष्ण प्रदेशातील लोकांना थंड प्रदेशातील लोकांपेक्षा चरबी साठवणुकीची गरज मूलतः एवढी नसते. त्यामुळे आपल्यात इन्सुलिनचा प्रतिरोध पाश्चात्त्यांच्या तुलनेत वजन कमी असले तरीही लवकर होत असल्याचे दिसून येते. इन्सुलिन प्रतिरोधामुळे फॅटी लिव्हरचे प्रमाणही आपल्याकडे पश्चिमी देशांपेक्षा झपाट्याने वाढले आहे. आपल्याकडे सर्वसाधारण लोकं बारीक असले तरी पोटाचा घेर वाढतो आहे व ही पोटातील वाढीव चरबीमुळे आपल्याकडे फॅटी लिव्हरचे प्रमाण जास्त दिसून येते.
* बदलती जीवनशैली ः गेल्या ३०-४० वर्षात जागतिकीकरणाच्या रेट्यात आपली जीवनशैली प्रचंड बदलली आहे. बैठी जीवनशैली, वर्क फ्रॉम होम, ट्रॅफिकमुळे प्रवासास लागणारा वेळ, यांत्रिकीकरण, हिंडण्यासाठी पुरेशी मोकळी मैदाने नाहीशी होणे, वाढलेला ताण व अपुरी झोप हे रोजचे झाले आहे. या सगळ्यामुळे इन्सुलिनचा प्रतिरोध वाढत आहे व खाल्लेलं अन्न जलदगतीने चरबीत रूपांतरित होत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे व तणावामुळे दारूचा वापर व इतर व्यसनांमुळे लिव्हरला सूज येणे यामुळे ही फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढले आहे.
* उपाय
- फॅटी लिव्हरचे प्रमाण कमी करायचे असेल तर भरीव सार्वजनिक आरोग्यधोरण हवे व आपला रोखप्रतिबंधन, गतिशील निदान व बहुआयामी उपाय प्रणालीकडे हवा.
प्राथमिक प्रतिबंधन यात आपल्याला मुख्यपणे जीवनशैली बदलावर लक्ष केंद्रित करायला हवे.
- आहार साक्षरता ः आपला आहार जास्त पोषणमूल्ययुक्त व आरोग्यदायी करण्याचा प्रयत्न हवा. आहारात आपल्याला संपूर्ण धान्य, फळे, भाज्या व हेल्थीफॅट्स वाढवावे लागतील. अतिरिक्त साखरेचा वापर टाळत प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वरचेवर वापर टाळावा लागेल. शासकीय धोरणे यासाठी अनुकूल करता येतील जेणेकरून अतिवापर कमी होईल जसे की, पॅकेटबंद पदार्थाबद्दल पोषण साक्षरता वाढवता येईल. आपल्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्व डाळी, कडधान्य वाढवली पाहिजेत. फायबर वाढवण्यासाठी तंतुमय हिरव्या पालेभाज्या व सॅलड्सचे प्रमाण वाढवले पाहिजे. विविध प्रथिने जसे टोफू, पनीर, सोया, दूध, दही, ताक याचे प्रमाण वाढवले पाहिजे. मांसाहार करणाऱ्यांनी अतिरिक्त चरबी असलेले मास टाळावेत व मासे तळून खाण्यापेक्षा भाजून, वाफवून किंवा कमी तेल वापरून बनवले पाहिजेत. बाहेर खाणे, प्रक्रिया केलेले अन्न टाळावे तसेच अतिरिक्त साखर असलेली पेय टाळावीत.
- व्यायाम संस्कृती ः आपण रोजच्या आयुष्यात हालचाल वाढवण्याची गरज आहे. दर आठवड्याला दीडशे मिनिटे मध्यम व्यायाम हे फॅटी लिव्हर व त्यासोबत येणारे मधुमेह, उच्चरक्तता, स्थूलता व कोलेस्टेरॉल यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करील. आपले वजन निरोगी कक्षेत ठेवण्याचा प्रयत्न करावा. फॅटी लिव्हर रिव्हर्स करण्यासाठी पाच ते दहा टक्के वजन टप्प्याटप्प्याने घटवणे, हे उत्तम. नियमित चालणे, सायकलिंग, वेट ट्रेनिंग असे व्यायाम नियमित करावेत. डिटॉक्स डाएट व तत्सम शॉर्टकट डाएट टाळावेत. हे लिव्हरला जास्त नुकसान पोचवतात हे जाणावे.
* तपास व जलद निदान
फॅटी लिव्हर ही एक मूकमहामारी आहे. ठराविक गंभीर जोखीम असलेले रुग्ण जसे मधुमेही, लठ्ठ व्यक्ती, उच्च रक्तदाब असलेली व्यक्ती, कॉलेस्टेरॉल जास्त असलेली व्यक्ती यांना तपासून फॅटी लिव्हर आहे का, याचा मागोवा घेता येईल. याबद्दल जाणीवजागृती व साक्षरता वाढवण्याची गरज आहे.
* वैद्यकीय उपाय -फॅटी लिव्हरचा उपचार घेताना एकत्रित सेवा महत्त्वाच्या ठरतात कारण, त्यासोबत इतर आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल हेही अगंतूक आजार असतात. आपली जीवनशैली संतुलित व वजन निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला, समुपदेशन स्वीकारावे. आहाराबद्दल व योग्य व्यायामाबद्दल प्रत्येकाने आपली साक्षरता वाढवावी तसेच दारूचा वापर व इतर व्यसनांचा वापर कमी करावा. योग्य सल्ल्याने आहारविहार आणी मनःशांतीच्या साथीने आपले आरोग्य जपले तर फॅटी लिव्हर रिव्हर्स होऊ शकते.
* पथ्य पाळावे
तेल व अतिरिक्त साखर असलेले घातक पदार्थ, पॅकेटबंद प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. वास्तविक ही वाढती मूक महासाथ रोखण्यासाठी शासनाने धोरणात्मक बदल करून घातक अन्नपदार्थ विक्रीवर चाप बसेल. सरतेशेवटी आपण सर्वांनी याबद्दल सजग होऊया आणि ही महासाथ थोपवूया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

