महिला विश्वचषक विजयापलीकडे

महिला विश्वचषक विजयापलीकडे

Published on

दखल..............लोगो

भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला; परंतु या पलीकडेही या विजयाकडे पाहिले पाहिजे. ही कहाणी फक्त विजयाची नाही त्यामागे असलेल्या कठोर परिश्रमाची आहे, महिलांच्या जिद्दीची आहे, त्यांच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाची आहे, महिलांनी दाखवलेल्या लढाऊ वृत्तीची आहे. जिंकल्यानंतर फक्त उन्मादी जल्लोष साजरा न करता पराभूत संघाचे खेळाडूंचे सांत्वन करण्याच्या उमदेपणाचीही आहे. विजयानंतरचे अनेक क्षण डोळे पाणावणारे आणि या महिलांबद्दल अभिमान वाटणारे आहेत; मात्र या पलीकडेही या विजयातून आपले क्रीडाभान जागृत होणार का, हे महत्त्वाचे. ते तसे होण्यास दुर्गम भागातही हा विजय मोठी कामगिरी बजावू शकतो.

- शिरीष दामले, रत्नागिरी.

----
विश्वचषकाने प्रेरणा मिळाली… आता उभी करू प्रयत्नांची परंपरा...

कोणत्याही समाजाला, त्यात आपल्या समाजाला थोडे अधिकच नायक-नायिका हवी असतात. त्यांच्याकडे बघून अनेकांच्या आकांक्षा उंचावतात, अनेकांना प्रेरणा मिळते. त्यातून वेगळ्या वाटेवर चालायला सुरुवात होते. कधी तो यशाचा मार्ग ठरतो, कधी अपयश पदरी येते; मात्र चालणे महत्त्वाचे असते. मर्यादित पातळीवर आपल्याकडे मुलींनी, महिलांनी क्रीडाक्षेत्रात पराक्रम केला आहेच. विशेष म्हणजे हे यश त्या एकटीचेही आहे. तिने पाहिलेल्या स्वप्नांचे आणि त्यासाठी घेतलेल्या श्रमांचे आहे. क्रिकेट विश्वचषक जिंकला म्हणून क्रिकेटचा विचार केला तर वाटद खंडाळ्यासारख्या अतिशय दुर्गम भागात राजेश जाधव या शिक्षकांनी जिल्ह्यातील पहिला मुलींचा क्रिकेट संघ बांधला. त्या संघाने चांगलीच भरारी घेतली. आपल्या जिल्ह्यातील मुली क्रिकेट खेळून पुढे वाटचाल करू शकतात, हा आत्मविश्वास या संघाने अनेक मुलींना दिला.
रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला अधिक कणखर अधिक समर्थ आणि कर्तृत्ववान असल्याचा इतिहास आहे. अगदी सामान्य जीवनातही महिला अधिक लढवय्या आहेत. जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेल्या नऊ महिला आहेत. त्यातील सात जणी या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत. घरी अथवा गावात कोणतीही क्रीडासंस्कृती नसलेल्या, यातील बॅडमिंटन खेळाडू माणिक केळकर अन् कॅरमपटू मैत्रेयी गोगटे या समाजातील तथाकथित उच्चस्तरातून आलेल्या चांगला पाठिंबा असलेल्या, उर्वरित साऱ्या संघर्ष करत यशापर्यंत पोहोचलेल्या म्हणून त्याचे महत्त्व आगळे. खो-खोमध्ये ऐश्वर्या सावंत असो किंवा आरती कांबळे अथवा अपेक्षा सुतार तर पॉवरलिफ्टिंगमध्ये संपदा धोपटकर, प्रियदर्शनी जागुष्टे, योगामध्ये पूर्वा किनरे, कॅरममध्ये आकांक्षा कदम या साऱ्या प्रेरणादायी कर्तृत्व गाजवणाऱ्या रत्नागिरीतील महिला. वांझोळेसारख्या दुर्गम भागात एका शिक्षकाने मिशन म्हणून तेथील मुलींचा खो-खोचा संघ बांधला. त्या मुलींना आणि गावाला खेळाची ओळखही फार नव्हती. मैदान असणे दूरचे; मात्र या संघाने नाव कमावले, एवढेच नव्हे तर त्यातील दोन मुली राष्ट्रीय स्तरावर खेळल्या.
महिलांनी विश्वचषक जिंकून अनेक महिलांना प्रोत्साहित केले असेल. मैदान गाजवण्यासाठी तयार व्हा. आपण मैदान गाजवू शकतो, अशी जिद्दही निर्माण केली असेल. आता वेळ आहे ती अशा योग्य मुली, तरुणी निवडून त्यांना पैलू पाडण्याची. निसर्गतः कोकणातील लोक कष्टाळू काटक आहेत. ते कोणत्या क्रीडाप्रकारात कौशल्य मिळवू शकतात, याची शास्त्रीय चाचणीही करता येईल. आपल्याकडे डेरवण येथे ऑलिंपिक दर्जाची सुविधा उपलब्ध झाली आहे, असे सांगितले जाते. अशा सुविधेचा उपयोग झाला याचा पडताळा काही खेळाडूंनी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली तरच मिळू शकतो. अशी झेप घेणारे खेळाडू तयार व्हावेत नाहीतर रिकामटेकड्यांच्या आनंदाला आणि उन्मादाला एखादा इव्हेंट साजरी करायला संधी मिळाली एवढाच या विजयाचा अर्थ उरेल.
---
चौकट
स्वप्न सत्यात उतरण्यासाठीचा पराक्रम
महिला विश्वचषक जिंकताना या महिलांनी मिळवलेल्या यशाकडे आणि खरेतर विश्वचषक उंचावल्याच्या पलीकडे पाहिले पाहिजे. छोट्या छोट्या गावातून ज्यांची नावेही आपल्याला माहीत नाहीत, अशा दुर्गम भागातून अनेक मुली आल्या. त्यांनी पराक्रम गाजवला. त्यामुळे आपल्या दुर्गम भागातील मुलीही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ शकतात. स्वप्नं पाहण्याची ताकद आणि त्यानंतर स्वप्न सत्यात उतरण्यासाठीचे पराक्रम, अशीही प्रेरणा असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com