दोडामार्ग येथे आज ''नशामुक्त पदयात्रा''
दोडामार्ग येथे आज
‘नशामुक्त पदयात्रा’
दोडामार्गः येथील पंचायत समितीतर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने तालुक्यात नशामुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने ‘नशामुक्त जनजागृती पदयात्रा’ आयोजित केली आहे. ही पदयात्रा उद्या (ता. ७) सकाळी ७.३० वाजता दोडामार्ग जिल्हा परिषद शाळा क्र. १ च्या मैदानातून होणार आहे. या पदयात्रेत तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल प्रशासनाचे प्रतिनिधी, पोलिसपाटील, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, सर्व सीआरपी, आशा व अंगणवाडी सेविका, एनएसएस व एनसीसी विद्यार्थी, युवक मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी, पोलिस विभागाचे प्रतिनिधी, स्थानिक नेते उपस्थित राहतील. झरे-२ येथील शरद क्षेत्र फंक्शन हॉलमध्ये जनजागृतीपर संदेश, नशाबंदी शपथ, संवाद सत्राचे आयोजन केले आहे, अशी माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी दिली.
..................
कचऱ्याच्या दुर्गंधीने
कलमठवासीय हैराण
कणकवलीः कलमठ-वरवडे मार्गे बीडवाडी मार्गावर कलमठ वृंदावन कॉलनी येथे रस्त्यालगत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे पादचारी व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी कॉलनीतील नागरिकांसह रिक्षाने जाणारे अन्य ग्रामस्थही कचरा टाकत असल्याने कुत्रे व माकड हा ओला, सुका कचरा रस्त्यावर आणत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. ग्राममंचायतीकडून उघड्यावर कचरा न टाकण्याचा फलक लावून तसेच घंटागाडीही पाठवित असतानाही होत असलेल्या या आगळीकीबाबत आता सीसीटीव्ही बसवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
...................
अहिल्यादेवी होळकर
जिल्हा पुरस्कार जाहीर
कणकवलीः महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शासनाने २०२०-२१ ते २०२३-२४ या चार वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. सिंधुदुर्गमधून २०२०-२१ साठी अक्षता कांबळी (कणकवली), २०२१-२२ साठी नम्रता नेवगी (सावंतवाडी), २०२२-२३ साठी सुजाता पडवळ (वेंगुर्ले), तर २०२३-२४ साठी श्रावणी मदभावे (कणकवली) यांची निवड केली आहे. पुरस्कार प्रदान करण्याबाबतच्या सूचना स्वतंत्र देण्यात येणार आहेत.
........................
कालेली महादेव
जत्रोत्सव रविवारी
दुकानवाडः कालेली येथील महादेवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी (ता. ९) होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजाअर्चा, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे याबरोबरच रात्री पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मानकरी पांडुरंग परब यांनी केले आहे.
...................
सातार्डा येथे मंगळवारी
बक्षीस वितरण सोहळा
सावंतवाडीः सातार्डा येथील पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवारी (ता. ११) सकाळी १० वाजता होणार आहे. पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर तालुकास्तरीय, गाव पातळीवरील विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. बक्षीसपात्र स्पर्धक, वाचक, हितचिंतक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाने केले आहे.
....................
मठ येथे १७ ला
कुलदैवत जत्रोत्सव
वेंगुर्लेः मठ गावचे जागृत देवस्थान, सोत्तार समाजाचे कुलदैवत विठ्ठलादेवी-मूळपुरुष देवाचा वार्षिक जत्रोत्सव १७ नोव्हेंबरला होणार आहे. यानिमित्त सकाळी मूळ घरात व मंदिरात धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, ओट्या भरणे तसेच सायंकाळी ७ वाजता नाईक मोचेमाडकर नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक कमिटी व स्थानिक व्यवस्थापक आबा मठकर यांनी केले आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

