''पिंगुळी''ची यशस्वी परंपरा कायम राखू
swt622.jpg
02846
पिंगुळीः मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता रॅली काढण्यात आली. (छायाचित्र ः अजय सावंत)
‘पिंगुळी’ची यशस्वी परंपरा कायम राखू
अजय आकेरकर ः ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम’चा स्वच्छता फेरीने प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ः मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत आज पिंगुळी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता फेरी काढण्यात आली. या फेरीच्या माध्यमातून अभियानाची सुरुवात झाली असून, या अभियानात पिंगुळी ग्रामपंचायत उल्लेखनीय कामगिरी बजावेल, असा विश्वास सरपंच अजय आकरेकर यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियान अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींतर्फे आपापल्या गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पिंगुळी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता फेरी काढून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. वॉर्ड क्र. ३ गुढीपूरच्या वतीने आकर्षक स्वच्छता रथ तयार करण्यात आला. त्या रथाद्वारे हलत्या प्रतिकृतींच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. दोन मुलांनी डस्टबिनचे रूप घेऊन डस्टबिनचा उपयोग शिकवला. या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
पिंगुळी म्हापसेकर तिठा ते राऊळ महाराज मठ आणि पुढे श्री रवळनाथ मंदिर या मार्गावर ही फेरी काढण्यात आली. पिंगुळी जिल्हा परिषद गुढीपूर शाळा तसेच बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतील विद्यार्थी या फेरीमध्ये विविध ऐतिहासिक वेशभूषांमध्ये सहभागी झाले. पिंगुळी ग्रामपंचायतीने यापूर्वी देखील विविध अभियानांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे या अभियानात देखील पिंगुळी ग्रामपंचायतीला बक्षीस मिळेल, असा विश्वास सरपंच आकेरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी, पिंगुळीला राऊळ महाराजांचे अध्यात्मिक आणि ठाकर लोककलेसारख्या पारंपरिक कलेचे अधिष्ठान लाभले आहे. या अभियानात देखील पिंगुळी ग्रामपंचायत आपली यशाची परंपरा कायम राखेल, असे सांगितले.
यावेळी उपसरपंच मंगेश मस्के, ग्राम विकास अधिकारी श्री. निवतकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भगवान रणसिंग, प्रशांत धोंड, शशांग पिंगुळकर, सागर रणसिंग, अन्वी बांदेकर, सोनाक्षी गावडे, ममता राऊळ, गुंडू मस्के, कृष्णा मसगे, भास्कर गंगावणे, अरुण सावंत उपस्थित होते.

