वेंगुर्लेतील आठ सायबर कॅफे, महा ई-सेवा केंद्रांना प्रशिक्षण
swt635.jpg
02883
वेंगुर्ले ः आदर्श आचारसंहितेबाबत माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी. बाजूला मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी.
वेंगुर्लेतील आठ सायबर कॅफे, महा ई-सेवा केंद्रांना प्रशिक्षण
नगरपरिषद निवडणूक ः बैठकीत आचारसंहितेबाबत सुचना
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ७ः नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील आठ सायबर कॅफे व महा ई-सेवा केंद्रांना निवडणुकीचे अर्ज भरण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक उमेदवाराला ४ अर्ज भरता येतील; मात्र अर्जासाठी लागणारे सूचक व अनुमोदक हे प्रत्येक अर्जाला वेगवेगळे लागतील, अशा सूचना आदर्श आचारसंहितेबाबत देण्यात आल्या.
राज्य निवडणूक आयोगामार्फत ४ नोव्हेंबरपासून सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपूर्ण क्षेत्रासाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. याबाबत सूचना व माहिती देण्यासाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे वेंगुर्ले पालिकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी माहिती दिली.
माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष पपू परब, शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख शैलेश परुळेकर, राष्ट्रवादी शरद पवार गट शहर सचिव स्वप्नील रावळ, माजी नगरसेविका साक्षी पेडणेकर, आकांक्षा परब, प्रार्थना हळदणकर, योगेश नाईक, सायमन आल्मेडा आदी उपस्थित होते.
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत व शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करावे. या अर्जासाठी लागणाऱ्या पोलिस परवानगीचे सर्व अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कक्षाच्या बाजूलाच उपलब्ध होतील. त्याच ठिकाणी त्या सर्व अर्जांची पूर्तता करून उमेदवाराकडे परवानग्या दिल्या जातील. यासाठी पोलिस ठाण्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही, अशा विविध सूचना यावेळी देण्यात आल्या.

