मंडणगड-आंबडवे ते नेपाळ प्रवास केवळ तेरा दिवसांत पूर्ण
Rat7p14.jpg-
02976
सुलतान दुचाकीसोबत मंडणगडचे निखिल पिंपळे.
Rat7p15.jpg-
02977
नेपाळमधील मनोकामना मंदिर येथे काढलेली ‘सेल्फी.’
-------
बाईकप्रेमी पिंपळेंची १३ दिवसांत नेपाळची वारी
आंबडवेतून सुरुवात; दिवसाला सरासरी ४०० किमी, प्रवास अविस्मरणीय
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ः दुचाकीवरून एकट्याने अख्खा भारत फिरलेले मंडणगडचे बाईकप्रेमी रायडर निखिल पिंपळे यांनी यंदा आणखी एक अनोखा पराक्रम साधला आहे. त्यांनी आंबडवे येथून सुरू करून नेपाळपर्यंतचा ५२५० किलोमीटर अंतराचा आंतरराष्ट्रीय सोलो बाईक प्रवास केवळ तेरा दिवसांत ११ ते २३ ऑक्टोबर कालावधीत पूर्ण केला आहे.
वयाच्या पन्नाशीकडे झुकलेल्या निखिल यांनी आपल्या प्रापंचिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबत बाईकसवारीची आवड जोपासत हा प्रवास पूर्ण केला. मधुमेह, रक्तदाबासारखे आजार आणि दोन मोठ्या शस्त्रक्रियांचा सामना करूनही त्यांनी आत्मविश्वास, शिस्त आणि मनोबलाच्या जोरावर हा धाडसी उपक्रम साध्य केला. त्यांनी आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करून प्रवासाला सुरुवात केली. मार्गक्रमणात त्यांनी भीमा कोरेगाव, रांजणगाव, शनिशिंगणापूर, देवगड दत्तधाम, जळगाव, जामनेरमार्गे मध्य प्रदेशात प्रवेश केला. तिथे त्यांनी बुऱ्हाणपूर (छत्रपती संभाजी महाराज स्वारीस्थान), रावेरखेडी (बाजीराव पेशवे समाधी), ओंकारेश्वर, महेश्वर, महू (डॉ. आंबेडकरांचे जन्मस्थळ) आदी ठिकाणी भेट दिली. यानंतर उत्तर प्रदेशातील झांशी, कानपूर, लखनौ, अयोध्यामार्गे बडनी बॉर्डर ओलांडत नेपाळमध्ये प्रवेश केला. नेपाळमध्ये सहा दिवस राहून त्यांनी लुंबिनी (गौतम बुद्ध जन्मभूमी), पोखरा, विंध्यवासिनी मंदिर, रूपसे धबधबा, मुक्तिनाथ, मनोकामना मंदिर, काठमांडू, पशुपतिनाथ मंदिर, चितवन नॅशनल पार्क, कुशीनगर (गौतम बुद्ध निर्वाणस्थळ) अशी प्रसिद्ध स्थळे पाहिली. परतीच्या प्रवासात त्यांनी वाराणसी, काशी विश्वनाथ मंदिर, अन्नपूर्णा देवी मंदिर, पेंच नॅशनल पार्क, नागपूर (दीक्षाभूमी) आणि यवतमाळ संविधान चौक अशा ठिकाणांना भेट दिली. यवतमाळ, नांदेड, सोलापूर, पंढरपूर, गोंदवले, महाबळेश्वर, मंडणगडमार्गे त्यांनी आंबडवे येथे परतीचा प्रवास करत वर्तुळ पूर्ण केले.
चौकट
‘सुलतान’सोबतचा साहसी प्रवास
या प्रवासात निखिल यांनी ‘रॉयल एनफिल्ड हिमालयन’ ही दुचाकी वापरली, त्यांनी तिला ‘सुलतान’ असे नाव दिले आहे. दिवसाला सरासरी ४०० किलोमीटर प्रवास, रात्री विश्रांती आणि थंडी, बर्फ, डोंगराळ रस्त्यांचा सामना करत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. थंड हवामान आणि उंच प्रदेशात कधी- कधी फक्त २०० किलोमीटरपर्यंतच प्रवास करता येत असे. तरीही प्रत्येक ठिकाणचे लोकजीवन, बोलीभाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास करत त्यांनी प्रवास अविस्मरणीय बनवला. ‘मी जिथे गेलो, तिथलेच अन्नपाणी घेतले. मिनरल वॉटर न पिता स्थानिक पाण्याशी आणि निसर्गाशी जोडलो गेलो. त्यामुळे आरोग्याची काहीच अडचण आली नाही,’ असे त्यांनी सांगितले.
चौकट
नेपाळ प्रवासाचा अनुभव
‘नेपाळमध्ये रस्त्याने प्रवेश करण्यासाठी पारपत्र लागत नाही; पण सीमेवर कडक तपासणी होते. भारतीय सीमकार्डला तिथे रेंज नसते, म्हणून नवीन सीम घ्यावे लागते. चलनबदल करूनच प्रवेश करावा लागतो. गाडीचे कागद, आधारकार्ड, वास्तव्याचा कालावधी या सर्व माहितीची पूर्तता आवश्यक असते,’ असे निखिल पिंपळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

