चिपळूणच्या सांजसोबत संस्थेला पुरस्कार जाहीर
‘सांजसोबत’ संस्थेला पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन प्रायोजित आणि आर्ट सर्कल आयोजित सुनीता देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमांतर्गत चिपळूणच्या सांजसोबत या संस्थेला सुनीताबाई–पु. ल. सेवाव्रती पुरस्कार देण्यात येणार आहे. याचे वितरण उद्या (ता. ८) होणार आहे.
सुनीताबाई आणि पु. ल. यांनी लाखोंच्या देणग्या देऊन खूप साऱ्या संस्थांना उभे राहण्यासाठी मोठं सहकार्य केले आहे. त्यांच्या आर्थिक पुढाकाराने उभ्या राहिलेल्या मुक्तांगणसारख्या संस्था आज समाजाचा आधारवड आहेत. या व्यतिरिक्त आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या आयुका आनंदवनसारख्या संस्थांचे हात त्यांनी अधिक बळकट केले. त्यांच्या या दातृत्वाला सलाम म्हणून हा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी चिपळूणची सांजसोबत ही संस्था निवडण्यात आली आहे. सांजसोबत ही संस्था देश माझा, मी देशाचा...देशाची समस्या माझी समस्या..मीच सोडवणार या त्रिसूत्रीवर काम करते. समाजमाध्यमावरून वेगवेगळ्या कट्टर, सौम्य, तटस्थ विचारसरणीचे, पक्षाचे, मानसिकतेचे लोक एकत्र आले आणि त्यांनी या त्रिसूत्रीवर काम सुरू केले. त्यातून सांजसोबत ही संघटना निर्माण झाली. कोकणात खूप आडगावात वृद्ध, निराधार लोकांची संख्या प्रचंड आहे. वयाची सत्तरी पार केलेल्या वृद्धांना मूलभूत गरजा भागणंही अनेकदा अशक्य होतं. अशावेळी त्यांच्या पाठीशी सांजसोबत उभी राहते. या मूलभूत गरजांसाठी मदतीचा हात देते. शारीरिक असमर्थता आणि गरिबी या दोन्हींनी हतबल असलेल्या वृद्धांसाठी सांजसोबत काम करते. आजवर सांजसोबतने ८० वृद्ध दत्तक घेतले आहेत. समाजमाध्यमातून त्यांचे सध्या २५० सभासद आहेत. प्रत्येक सभासद दर महिन्याला अगदी १०० रुपयांपासून जमेल तेवढी रक्कम जमा करतात. सांजसोबतचे हात बळकट करण्यासाठी संस्थेचा खारीचा वाटा म्हणजे सुनीताबाई -पु. ल. सेवाव्रती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

