​रत्नागिरी -४४ कोटीच्या डांबर खरेदीच्या अनियमिततेची चौकशी व्हावी

​रत्नागिरी -४४ कोटीच्या डांबर खरेदीच्या अनियमिततेची चौकशी व्हावी

Published on

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता

बाळ माने : सीबीआय, ईडी आदींकडे तक्रार

रत्नागिरी, ता. ७ : ​रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत डांबर खरेदीमध्ये अनियमितता आढळली आहे. चलन नसताना पालिकेने पैसे अदा केले आहेत. यामध्ये सुमारे ४४ कोटी ६९ लाखांची अनियमितता आढळून आल्याचे आम्ही मागवलेल्या माहितीच्या अधिकाराखाली पुढे आले आहे. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीकडून चलन घेण्यात आली नाहीत, असा आरोप माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी केला.
येथील हॉटेल व्यंकटेशमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुलगा मिहिर आणि विराज माने उपस्थित होते. सत्तेत असताना आपल्या राजकीय पदाचा उदय सामंत यांनी गैरवापर केल्याचाही आरोप करून, या प्रकरणाची सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लोकायुक्त आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दिली असून, या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केल्याचेही माने यांनी सांगितले. ‘माहितीचा अधिकार कायदाअंतर्गत मिळवलेल्या कागदपत्रांचे परीक्षण केले असता नगरपरिषदेच्या हद्दीतील जवळपास सर्वच डांबरी रस्त्यांची कामे सामंत कंत्राटदार प्रा. लि. या कंपनीला देण्यात आल्याचे निदर्शनास आले. या कंपनीस एकूण सुमारे ११४ कोटी ८२ लाख ८२ हजार १२२ इतक्या रकमेची रस्त्याची कामे देण्यात आली. त्यापैकी ४४ कोटी ६९ लाख २७ हजार रकमेच्या डांबरी रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता आढळून आली. संबंधित कंपनीचे चलन दिले नाही. चलन न तपासताच पालिकेने त्यांची देयके अदा केली आहेत. चलन सादर करणे आणि त्यांची तपासणी करणे अनिवार्य आहे.​ या नियमांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून देयके दिल्याने शासकीय निधीचा अपव्यय व गैरवापर झाल्याचा संशय असून, याची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणीही त्यांनी केली.
रत्नागिरी पालिकेमार्फत झालेले सर्व रस्‍त्‍यांच्‍या कामांचे तांत्रिक आणि वित्तीय फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. कामाशी संबंधित सर्व मूळ आणि डिजिटल नोंदी तातडीने सील करून सुरक्षित ठेवण्यात याव्यात. ४४ कोटी निधीचा अपव्यय किंवा गैरवापर झाला असल्यास त्याची पारदर्शक चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार बाळ माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
-------------------
चौकट
पोकळ आरोपांचा परिणाम नाही : उदय सामंत
बाळ मानेंची हीच टेप लोकसभेला वाजली. त्यानंतर विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही टेप वाजली आहे. माझ्या वडिलांनी मोठ्या कष्टाने ही आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी उभी केली आहे. त्या कंपनीचे नाव कोकण नव्हे, तर राज्यात आहे. त्यामुळे अशा पोकळ आरोपांनी आणि पत्रकार परिषदांनी माझ्यावर, आमच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. बाळ माने आमच्यावर जेवढे आरोप करतील तेवढी आमची मते वाढतील, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com