दंडात्मक कारवाईतून पावणेतेरा कोटी वसूल
विनातिकीट प्रवाशांना दे धक्का
कोकण रेल्वे ; कारवाईतून पावणेतेरा कोटी वसूल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यात पावणेदोन लाख विनातिकीट व अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करत १२ कोटी ८१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत ५ हजार ४९३ विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये १ लाख ८२ हजार ७८१ अनधिकृत व अनियमित प्रवास करणारे आढळून आले. त्यांच्याकडून रेल्वेभाडे आणि दंड म्हणून १२ कोटी ८१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत त्याचबरोबर ऑक्टोबर २०२५ या एका महिन्यात कोकण रेल्वेने ९२० विशेष तपासणी मोहीम राबवल्या. त्यात ४२ हजार ६४५ अनियमित प्रवासी आढळून आले. त्या एकाच महिन्यात भाडे आणि दंड म्हणून २ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वैध तिकीट खरेदी करावे. योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे आणि संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे सुरूच राहणार आहे. प्रवाशाभिमुख सेवा, सुरक्षा आणि कार्यक्षम रेल्वे परिचालन कायम ठेवण्यासाठी कोकण रेल्वे कटिबद्ध असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
---

