पसायदानातील 11 सुंदर मागण्या
संताचे संगती पसायदान...
(६ नोव्हेंबर टुडे ३)
जेव्हा आपल्याकडे कोणी व्यक्ती येते आणि आपल्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा जर आपण काही कामात असू तर त्या व्यक्तीला प्रथम थांबायला सांगतो. आपल्या हातातील काम पूर्ण झाले की, मग आपण म्हणतो आता बोल. म्हणजेच एखादे काम पूर्ण झाले की, त्यानंतर सुरू होणाऱ्या कृतीला ‘आता’ हा शब्दप्रयोग केला जातो. जसे पसायदानावरील हे लेख सुरू करताना मी म्हटले, जानेवारी २५ पासून या लेखमालेतील लेख आले. आता समारोपाच्या निमित्ताने पसायदान पाहूया. तसे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या समारोपाच्या भागात पसायदान मागितले आहे.
- rat११p१.jpg-
25O03662
- धनंजय चितळे, चिपळूण
---
पसायदानातील ११ सुंदर मागण्या
श्री ज्ञानेश्वरी म्हणजे धर्मकीर्तन आहे, असे श्री माऊली स्वतः म्हणतात. कीर्तनाच्या सांगतेला जसा प्रसाद असतो तसा प्रसाद श्री माऊलींनी येथे मागितला आहे. या ठिकाणी ते पसायदान म्हणजे प्रसादाचे दान मागत आहेत. भारतीय संस्कृतीने प्रत्येक गोष्टीची तपशीलवार माहिती दिलेली आढळते. स्कंदपुराणांमध्ये दान म्हणजे काय, दान कोणी द्यावे, दान विफल कधी होते याबाबतची सविस्तर चर्चा आली आहे. आपल्या लेखांची मर्यादा लक्षात घेऊन मी जिज्ञासू वाचकांना तो भाग मुळातूनच वाचण्याची प्रार्थना करतो. त्या भागातील महत्त्वाचा भाग म्हणजे ज्याच्याकडे दान मागायचे त्याची प्रथम काही सेवा घडली पाहिजे. जे मागायचे त्याचा आपल्याला काही उपयोग असायला हवा आणि ते मागणे देणाऱ्याच्या आवाक्यातले असायला हवे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या अज्ञानी श्रीमद् भगवद्गीता प्राकृत भाषेत सांगितली म्हणजे त्यांची सेवा झाली. या पसायदानात जे मागितले आहे ते मागणारे श्री ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत श्री ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात माऊली म्हणतात, ''हे विश्वचि माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला.'' थोडक्यात, ते सर्वव्यापी सर्वांतरयामी असल्यामुळे सर्वांच्या कल्याणाची मागणी ही त्यांच्या उपयोगाचीच आहे आणि श्री सद्गुरूंकडे काहीही करण्याची शक्ती असल्यामुळे ते देणे श्री सद्गुरूंच्या आवाक्यातील आहे. या पहिल्या ओवीमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी एक यज्ञ सांगितला आहे, तो म्हणजे वाकयज्ञ. हा शब्दही श्री ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायात आलेला आढळतो. यज्ञाचे विविध प्रकार सांगताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
शब्दी शब्दु यजिजे।
तया नाव वाग्यज्ञ म्हनिजे ।।
अर्थात, शब्दरूपी अग्नीमध्ये शब्दरूपी समिधांचे केलेले हवन म्हणजे हा यज्ञ होय. यज्ञ करताना हे माझे नाही, ही भावना असणे खूप महत्त्वाचे आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांची संपूर्ण ज्ञानेश्वरी याच अकर्तेपणाने साकारलेली आहे म्हणूनच त्यांच्या लेखनाला यज्ञ असे संबोधणे अगदी योग्य आहे. विशेष म्हणजे, आपल्या सद्गुरूंनी आपल्या सेवेने संतुष्ट व्हावे आणि त्या भावनेनेच आपल्याला पसायदान द्यावे, असे श्री माऊली सांगतात. वाचकहो, आपणही आपल्याकडे आलेल्या माणसाला देणगी देतो, भिकाऱ्याला दान देतो; पण त्यामागे आपला संतुष्ट भाव असतो का? तर बऱ्याचवेळा ही कटकट लवकर जाऊ दे म्हणूनच आपण ती रक्कम त्याला देत असतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांना तसे दान नको आहे. पसायदानात एकूण ११ मागण्या आल्या आहेत.
दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा होवो, त्यांच्यात सत्कर्माबद्दलचे प्रेम वाढवा, भूतमात्रांचे एकमेकांशी मैत्र जमूदे, पापाचा अंधःकार नाहीसा होऊदे. स्वधर्म सूर्याने विश्व उजळू दे, प्राणीमात्राची इच्छापूर्ती होऊदे, भूतमात्राला ईश्वरनिष्ठांचे मेळावे सदैव भेटू देत, संतजन सर्वांचे सोयरे होऊ देत, त्रिभुवन सर्व सुखी होऊदे, त्रैलोक्यात आधी पुरुषाची अखंड भक्ती घडूदे, ग्रंथोपजीवी जनांना इहपरलोकी सुखलाभ होऊदे. त्यांचे प्रत्येक मागणेही किती सुंदर आहेना? ज्याप्रमाणे आईला आपल्या अशक्त मुलाची कमी हुशार मुलाची जास्त काळजी असते त्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर माऊली नाही सज्जनांपेक्षा खळ म्हणजेच दुर्जनांची काळजी जास्त आहे म्हणून त्यांचे पहिले मागणे हे दुर्जनांची दुष्ट बुद्धी नष्ट व्हावी, असे आहे.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

