लांजा -नगरपंचायतीत आघाडीचे ठरले, महायुतीचे अडले

लांजा -नगरपंचायतीत आघाडीचे ठरले, महायुतीचे अडले

Published on

rat11p14.jpg
03721
लांजा नगरपंचायत
---------
लांज्यात आघाडी एकवटली, महायुती गोंधळात
ठाकरे शिवसेना लढवणार नगराध्यक्षपदाची निवडणूक; युती मात्र अधांतरीच
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ११ ः लांजा नगरपंचायतीची निवडणूक ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीद्वारे लढवणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदाचा उमेदवारही निश्चित केला असून, ही संधी ठाकरे शिवसेनेला मिळणार आहे; मात्र महायुतीमधील धुसफूस अजूनही सुरूच असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे तर नगरसेवकपदासाठी सर्वच पक्षात एकापेक्षा अधिक इच्छुक असल्यामुळे तिढा निर्माण झाला असून, तो सोडवायचा कसा असा प्रश्न नेत्यांना पडलेला आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी अजून एकही अर्ज दाखल झालेला नाही. महायुतीकडून नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही; मात्र महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाला नगराध्यक्षपदासाठी संधी दिली आहे. त्यांच्याकडून पूर्वा मुळे यांचे नाव पुढे येत आहे. शिवसेना शिंदे गटाला त्याची अधिक झळ बसत असल्याचे दिसत आहे. राज्यात युतीची सत्ता असताना लांजा शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी एकला चलोचा नारा दिल्यामुळे भाजप-शिवसेना युती फिस्कटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांकडून नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या १७ जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करणार असल्याचा दावा केला आहे. निवडणुकीच्यानिमित्ताने हे दोन्ही पक्ष स्वतःची ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय गोंधळ सुरू असतानाच भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाकडून दोन दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे मुलाखती घेतल्यामुळे आता युती झाली तर बंडखोरी मोठ्या प्रमाणात होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
आमदार किरण सामंत आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. त्यात एका नगरसेवक पदासाठी चार ते पाचजणं इच्छुक असल्याचे दिसून आले. त्यामुळे उमेदवारीचा तिढा सोडवायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामंत यांची पक्षसंघटनेवर पकड असल्यामुळे पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराविरोधात बंडखोरी होण्याची शक्यता फारच कमी असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीमधील दुसरा घटकपक्ष भाजपनेही नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत तसेच ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनीही आपापल्या पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन चाचपणी केली. मुलाखती झाल्या असल्या तरी अधिकृत नावे जाहीर केलेली नाहीत.

कोट १
लांजा नगरपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची एकजूट झाली असून, नगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार आहे. नावही निश्चित झाले आहे. त्यामुळे लवकरच अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
- मोहन तोडकरी, शहरप्रमुख शिवसेना, ठाकरे गट

कोट २
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर भाजपच्या युतीसंदर्भात अद्यापही बोलणे चालू आहे. लवकरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. आमच्या भावना पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्यात आलेल्या आहेत.
- शैलेश खामकर, तालुकाध्यक्ष, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com