खेड -न्यू मांडवे धरण पूर्ण करा, अन्यथा आंदोलन
न्यू मांडवे धरण प्रकल्प
पूर्ण न केल्यास आंदोलन
खेड, ता. ११ : तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्प २१ वर्षांपासून रखडला असून, त्यामुळे किंजळेतर्फे नातू, पुरे, तळे, कुडोशी आणि सुकिवली या पाच गावांतील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. धरणाच्या पूर्णत्वासाठी प्रशासनाकडून योग्य कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारी रोजी धरणाच्या ठिकाणी आत्मदहनाचा अवलंब करण्याचा इशारा जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिला आहे.
न्यू मांडवे धरण प्रकल्पाला १९८३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या धरणामुळे परिसरातील शेती ओलिताखाली येऊन भाग सुजलाम् सुफलाम् होणार होता तसेच पाणीटंचाईची समस्या कायमची मिटणार होती. याच धरणावर २ मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव होता; मात्र हा प्रकल्प आजतागायत कागदावरच राहिला आहे. न्यू मांडवे धरण प्रकल्पाचा द्वितीय सुप्रमा (सुधारित प्रस्ताव मान्यता) वित्त विभागाकडे पाठवून चार महिने उलटले, तरी त्यावर कोणतीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे प्रकल्प रखडलेलाच आहे. धरणाच्या कामाला गती देऊन प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा मार्ग पत्करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले तसेच लघुपाटबंधारे खात्याने प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

