सुनीताबाईंनी साधनशुचिता, कलेवरची अंतिम निष्ठा जपली

सुनीताबाईंनी साधनशुचिता, कलेवरची अंतिम निष्ठा जपली

Published on

rat11p12.jpg-
O03709
रत्नागिरी : सुनीताबाई जन्मशताब्दी उपक्रमात चिपळुणच्या सांजसोबत संस्थेला ''सुनीताबाई -पु. ल. सेवाव्रती पुरस्कार प्रदान करताना मंगला गोडबोले. सोबत मान्यवर.
-----------
सुनीताबाईंनी साधनशुचिता अन् कलेवरील निष्ठेचा ठेवला आदर्श
मंगला देशपांडे ; जन्मशताब्दी कार्यक्रमाचे राज्य मराठी विकास संस्था, आर्ट सर्कलतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : बहुढंगी कलाकार, साहित्यिक पु. ल. देशपांडे यांची पत्नी व साहित्यिक, रत्नागिरीच्या माहेरवाशिण सुनीताबाई देशपांडे यांनी साधनशुचिता आणि कलेवरची अंतिम निष्ठा या दोन मूल्यांच्या साह्याने अतिशय निरलसपणे गृहिणी, सखी, सचिवपण पार पाडलं, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी सुनीताबाई जन्मशताब्दी कार्यक्रमात केले. राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग आणि आर्ट सर्कल आयोजित या कार्यक्रमाला तीन दिवस रत्नागिरीकरांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.
या तिन्ही दिवशी साहित्यिक, सांस्कृतिक मेजवानी रत्नागिरीकरांना लाभली. या वेळी लेखिका मंगला गोडबोले यांनी ‘सुनीताबाई’ या त्यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने सुनीताबाईंच्या आयुष्यावर भाषण केले. सुनीताबाईंनी लेखक, कलावंतांच्या स्वामित्व हक्कांसाठी महत्त्वपूर्ण लढा दिला. कितीतरी लेखकांची जन्मशताब्दी होते; मात्र लेखकपत्नीची जन्मशताब्दी होण्याचा योग दुर्मिळ आहे, असे गौरवोद्गार मंगला गोडबोले यांनी काढले.
समारोपाच्या दिवशी दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल होती. या वेळी गोडबोले यांच्यासमवेत पु. ल. देशपांडे यांचे पुतण्या जयंत देशपांडे आणि सुनीताबाईंचा भाचा संतोष ठाकूर उपस्थित होते. जयंत आणि दीपा देशपांडे यांनी पु. लं. च्या आठवणी, ‘आठवणी भाईकाकांच्या’ या कार्यक्रमातून जागवल्या. प्रवीण बांदेकर यांनी सुनीताबाईंच्या आत्मचरित्राचा उहापोह करताना ‘आहे मनोहर तरी- बरंच काही आहे’ या विषयावर व्याख्यान दिले. प्रसिद्ध कवी किरण येले यांनी सुनीताबाईंच्या काव्यप्रेमाचा मागोवा आपल्या ‘सुनीताबाईंच्या आत्मचरित्राचे वेगळेपण’ या भाषणातून घेतला. कौशल इनामदार यांनी ‘कवितेचे विभ्रम- कविता, संगीत आणि अनुभव’ असे सप्रयोग व्याख्यान दिले. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी ‘आठ आण्यातले लग्न’ या सुनीताबाईंच्या लेखाचे अभिवाचन केले. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते किरण यज्ञोपवित यांनी ‘सुनीताबाई आणि नाटक’ या विषयामधून सुनीताबाईंची अफाट अभिनय क्षमता, त्यांनी साकारलेल्या भूमिका, अर्ध्यावरून सोडलेले नाटकाचे क्षेत्र याचा मागोवा घेतला. जन्मशताब्दी उपक्रमात शेवटी प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी सुनीताबाईंच्या अभिरूचीला स्मरून कविता सादर केल्या.

चौकट १
चित्र, पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद
उपक्रमाच्या तीनही दिवसांमध्ये रसिकांसाठी खुल्या असलेल्या बाळ ठाकूर यांच्या चित्रप्रदर्शनाला आणि पुस्तकविक्रीला उदंड प्रतिसाद मिळाला. या जन्मशताब्दी वर्षात साहित्याचे विविधांगी कार्यक्रम करण्याचा मानस आहे, असे आर्ट सर्कलने या कार्यक्रमात जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com