मंडणगड ः कर्मचाऱ्यांच्या संघर्षामुळे मंडणगडमधील ३२ बस फेऱ्या रद्द
rat11p15.jpg
03722
मंडणगडः गाड्या रद्द केल्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना स्थानकात तिष्ठत बसावे लागले.
---------
व्यवस्थापन-कर्मचारी
संघर्षात प्रवाशांचा बळी
मंडणगड आगाराचे वेळापत्रक बिघडले; ३२ फेऱ्या रद्द
चौकट
एक नजर
* आगार व्यवस्थापकांच्या मनमानीला कर्मचाऱ्यांचा विरोध
* चालक-वाहकांचा ओव्हरटाईमला नकार
* सलग दुसऱ्या दिवशीही प्रवासी तिष्ठत
* वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतरही प्रश्न जैसे थे
मंडणगड, ता. ११ ः मंडणगड आगारातील चालक आणि वाहक कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात घेतलेली भूमिका दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्यानंतर सोमवारी (ता. १०) १८ प्रवासी फेऱ्या रद्द करण्यात आल्या. हा निर्णय आजही (ता. ११) कायम राहिल्यामुळे १४ लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत; मात्र, ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. त्याचा फटका तालुक्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.
मंडणगड आगार व्यवस्थापकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मंडणगड आगारातील चालक व वाहक कर्मचाऱ्यांनी काल डबलड्युटी आणि ओव्हरटाईम करण्यास नकार दिला. त्यामुळे दुपारच्या सत्रात सुटणाऱ्या ग्रामीण तसेच वस्त्यांवरील बसफेऱ्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्याच न सुटल्यामुळे शहरात आलेले विद्यार्थी, महिला, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व अन्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालक व वाहकांअभावी १८ अठरा ग्रामीण फेऱ्या रद्द करण्यात आल्या. प्रशासकीय दडपशाही, वारंवार नोटिसा व दंडात्मक कारवाई यामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी निषेधही नोंदवला आहे. आगारात कर्मचारी कमी असल्याने काही कर्मचाऱ्यांवर ओव्हरटाईम व डबलड्युटीचे ओझे पडते, असे एसटी आगारातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सलग दुसऱ्या दिवशीही मंडणगड आगारातील परिस्थिती जैसे थे राहिल्यामुळे विभागीय वाहतूक अधिकारी मंडणगड येथे दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही प्रवासी बसचे वेळापत्रक कोलमडलेलेच आहे. रद्द झालेल्या फेऱ्यांमध्ये बीड १, मुंबई २, शिर्डी २, बोरिवली १, नालासोपारा १ अशा एकूण १४ लांब पल्ल्यांच्या फेऱ्या होत्या.
चौकट १
लालफितीच्या कारभारावर आक्षेप
कर्मचाऱ्यांच्या मते, आगार व्यवस्थापकांनी किरकोळ चुका झाल्यास कठोर शिक्षा देण्याची पद्धत अवलंबली आहे. काही कर्मचाऱ्यांना उत्तम कामगिरी म्हणून गुलाबपुष्प देण्यात आले; पण त्याच वेळी तासाभरानंतर चार्जशीट देऊन शिक्षाही केली. या मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांच्या लालफितीच्या कारभाराचा निषेध नोंदवत ओव्हरटाईम करण्यास नकार दिला आहे. स्थानिक नागरिक आणि तालुकावासियांनी या पार्श्वभूमीवर संबंधित आगार व्यवस्थापकांची तातडीने उचलबांगडी करण्याची मागणी केली आहे.
चौकट २
विद्यार्थी व नागरिकांना मनस्ताप
आगार व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील या प्रशासकीय शीतयुद्धाचा फटका थेट प्रवाशांना बसला आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांना बसस्थानकावर ताटकळत थांबावे लागले तर नागरिक व प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. दिवसभर बसस्थानकातील चौकशी कक्षात अनेकदा वादाचे प्रसंग घडले. मंडणगड आगारातून मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज आदी मार्गांवरील लांब पल्ल्याच्या यशस्वी फेऱ्या मागील काही महिन्यांपासून बंद करण्यात आल्या असून, नव्या प्रयोगांच्या नावाखाली प्रवाशांची गैरसोय वाढत आहे. त्यामुळे तालुकावासियांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
कोट
ऐनवेळी गाड्या रद्द केल्याची घोषणा तसेच अनेक वस्तीच्या गाड्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय झाली. गाडी दुसऱ्या गावात जाऊन येईपर्यंत प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले. एकंदरीत मंडणगड आगार व्यवस्थापनाचा आजचा कारभार जनतेला मनस्ताप देणारा ठरला आहे.
- अरविंद येलवे, प्रवासी
कोट
आगारात कर्मचारी संख्या अपुरी आहे. आवश्यक १६८ चालक-वाहकांपैकी फक्त १४१ कर्मचारी कार्यरत आहेत. २७ जणांची कमतरता भासते. दररोज मंडणगड आगारातून सुमारे १९४ फेऱ्या सोडल्या जातात ज्यातून सुमारे १२ हजार १३५ किलोमीटर प्रवास केला जातो. तसेच कार्यालयीन क्लार्क व वाहतूक नियंत्रक अशा चार पदांवरही कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नियमित कामाबरोबर दुहेरी सेवा (ड्युटी) करावी लागते. काल एकूण १६ कर्मचाऱ्यांनी डबल ड्युटी करण्यास नकार दिल्यामुळे चालकांची कमतरता जाणवली.
- मदनीपाशा जुनैदी, आगार व्यवस्थापक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

