मालवणात काँग्रेसकडून उमेदवारांची नावे जाहीर
मालवणात काँग्रेसकडून
उमेदवारांची नावे जाहीर
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ ः येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यात आज महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसकडून शहरातील प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार (ता.१०) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे. भाजप, शिंदे शिवसेना यांच्यात महायुती होणार की नाही?, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आज राष्ट्रीय काँग्रेसचे पक्ष निरीक्षक अरविंद मोंडकर यांनी आज प्रभाग क्रमांक एकमधून संदेश कोयंडे, आर्या चिंदरकर, प्रभाग चारमधून गणेश पाडगावकर, प्रभाग पाचमधून ॲड. अमृता मोंडकर, प्रभाग आठमधून रुपाली फर्नांडिस, सारिका तळवडेकर, प्रभाग नऊमधून सायली कुबल, प्रभाग दहामधून गोविंद चव्हाण, सुमेधा धुरी हे उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेस ही निवडणूक स्वतंत्ररित्या लढणार की महाविकास आघाडी म्हणून लढणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

