सावंतवाडीत दुहेरी लढतीची शक्यता

सावंतवाडीत दुहेरी लढतीची शक्यता

Published on

सावंतवाडीत दुहेरी लढतीची शक्यता

पालिका निवडणूक; महायुतीसाठी बैठकांचा सपाटा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती करून लढलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी पालिका निवडणूक संदर्भात सुरुवातीला केलेली स्वबळाची तयारी आता युती करण्यावर येऊन ठेपली आहे. या ठिकाणी युती करण्यासंदर्भात भाजपचे स्थानिक नेते आणि आमदार दीपक केसरकर व अन्य पदाधिकाऱ्यांची बैठकीही झाली. त्यामुळे या ठिकाणी युती होण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे, असे झाल्यास पालिका निवडणुकीत दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
ठाकरे शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सिमा मठकर यांचे नाव जाहीर केले आहे तर भाजपकडून युवराज श्रद्धाराणी भोसले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, शिंदे शिवसेनेकडून अद्यापही कोणाचेच नाव आघाडीवर असल्याचे दिसून येत नाही. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडे युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले आणि माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी उमेदवारी मागितली आहे तर शिवसेना (शिंदे गट) संजना परब, आनारोजिन लोबो, अॅड. निता कविटकर, भारती मोरे यांची नावे चर्चेत आहेत. ठाकरे शिवसेनेने माजी आमदार जयानंद मठकर यांच्या स्नुषा सिमा मठकर यांचे नाव जाहीर केले आहे. काँग्रेसतर्फे महिला जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी इच्छुकता दर्शविली आहे. या ठिकाणी कालपर्यंत भाजप आणि शिंदे शिवसेना हे स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जातील, असे राजकीय वातावरण पाहायला मिळत होते. मात्र, खासदार नारायण राणे यांनी युतीबाबत दर्शवलेल्या भूमिकेनंतर काहीसे या ठिकाणी वातावरण बदलल्याचे दिसून आले. सोमवारी (ता.१०) खुद्द पालकमंत्री नीतेश राणे यांनी सावंतवाडीत येऊन राजघराण्याची तसेच भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिवाय आज भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आमदार केसरकरांच्या निवासस्थानी येऊन युती संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. बंद दाराआड बैठकीत नेमके काय घडले? हे कळू शकले नाही. मात्र, युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. युती झाल्यास उमेदवार नेमका कोण? हे गुलदस्त्यात असले तरी युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांचे नाव सध्या तरी आघाडीवर आहे.
युती झाल्यास या ठिकाणी भाजप आणि शिवसेना या दोघांनाही फायदा होणार आहे. मात्र, युती फिसकटल्यास या ठिकाणी काहीशी समीकरणे बदलणार आहेत. दोघेही स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा बऱ्यापैकी ठाकरे शिवसेनेला होईल. ठाकरे शिवसेनेकडून जाहीर केलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. मठकर यांचा शहरामध्ये दांडगा संपर्क आहे. महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून त्या नेहमी लोकांच्या संपर्कात येत असतात. शिवाय माजी आमदार (कै.) जयानंद मठकर यांच्या त्या स्नुषा असल्याने त्याचा फायदाही त्यांना काही प्रमाणात होणार आहे. मात्र, भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्यासच हे चित्र दिसेल. मात्र, युतीतून लढल्यास या ठिकाणी युतीला मोठा फायदा होणार आहे. एकूणच सगळ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची भूमिकाही काही ठिकाणच्या जागांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
---
दुबार मतदारांची संख्या १९१
येथील पालिका निवडणुकीत १९१ दुबार मतदारांची संख्या आहे तर एकूण १९ हजार ४२९ मतदारांची नोंदणी झाली आहे. असे निवडणूक शाखेतून सांगितले आहे. एकूण १० प्रभागांमध्ये २० उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. या दहाही प्रभागांमध्ये समान मतदार नाहीत तर काही प्रभागांमध्ये जास्त तर काही प्रभागांमध्ये कमी मतदार नोंदणी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे २३३४ तर प्रभाग क्रमांक ६ मध्ये सर्वांत कमी १५२९ मतदार नोंदणी झाले आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार श्रीधर पाटील तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची नेमणूक केली आहे.
---------------
प्रभाग निहाय मतदार
प्रभाग*मतदार
१*२१२७
२*२३३४
३*२१२४
४*२०३५
५*२०३१
६*१५२९
७*१७६६
८*१७९०
९*१५८७
१०*२११६
एकूण*१९४२९
-------------

Marathi News Esakal
www.esakal.com