...अन्यथा वीसही जागांवर उमेदवार
03795
...अन्यथा वीसही जागांवर उमेदवार
अजित पवार गट ः सावंतवाडी पालिकेसाठी भूमिका स्पष्ट
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः येथील पालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून चर्चेलाही बोलावले नाही. त्यामुळे शुक्रवार (ता.१४) पर्यंत आम्ही वाट पाहू; अन्यथा नगराध्यक्ष पदासह वीसही जागांवर आमचे उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी आज येथे दिली. राष्ट्रवादीला कमी लेखाल तर अडचणीत याल आणि बरोबर घेतला तर यश मिळवाल, असा सूचक इशाराही श्री. भोसले यांनी देत उल्का वारंग या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार असल्याचे जाहीर केले.
श्री. भोसले यांनी आज येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष उमाकांत वारंग, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुरेश गवस, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, प्रदेश महासचिव शफिक खान, अनंतराज पाटकर, महिला तालुकाध्यक्ष सिद्धी परब, शहर अध्यक्ष ऑगस्तिन फर्नांडिस, महिला जिल्हा उपाध्यक्ष रंजना निर्मल, मानसी देसाई, गुरुनाथ कामत आदी उपस्थित होते. श्री. भोसले म्हणाले, ‘महायुतीसाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांकडून शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यासोबत समन्वय सुरू आहे. परंतु, या ठिकाणी स्थानिक पातळीवर अद्यापही आम्हाला कोणालाही चर्चेसाठी बोलावण्यात आलेले नाही. आमची महायुती व्हावी, अशी इच्छा आहे, त्यासाठी आम्ही आमचे दरवाजे खुले ठेवले आहेत. परंतु, आम्हाला कोणीही कमी लेखू नये. उद्या मतदानानंतर निकालावेळी उमेदवार पराभूत झाल्यास त्याला भाजप आणि शिंदे शिवसेना हे दोन्ही पक्ष जबाबदार राहतील. शुक्रवार (ता.१४) पर्यंत महायुतीसाठी वाट पाहू. समोरून कोणीही बोलावले नाही तर आम्ही ‘एकला चलो’ची भूमिका घेऊ. सद्यस्थितीत अशा प्रकारची तयारी ठेवली आहे.’
----------------
नगराध्यक्ष पदासाठी उल्का वारंग निश्चित
नगराध्यक्ष पदाची संभाव्य उमेदवार म्हणून आम्ही उल्का वारंग यांना निवडले आहे. तर वीसही जागेवर जनतेमधील उमेदवार निश्चित केले आहेत. आमचे उमेदवार हे सुशिक्षित तसेच लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्यांपैकी आहेत. त्यामुळे आम्हाला निश्चितच निवडणुकीमध्ये यश मिळेल, असा विश्वासही श्री. भोसले यांनी व्यक्त केला.

