दुचाकी अपघातात एक वृद्ध ठार
दुचाकी अपघातात
एक वृद्ध ठार
रत्नागिरी, ता. ११ ः तालुक्यातील खरवते येथील तीव्र उतारातील वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. संजय सखाराम सनगरे (६०, रा. कोतवडे, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. अपघाताची ही घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी साडेदहाच्या सुमारास खरवते रस्त्यावरील तीव्र उतारातील वळणावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सूर्यकांत जयदेव वारेकर (५०, रा. कोतवडे, रत्नागिरी) हे संजय सनगरे यांच्या सोबत कोतवडे येथील महालक्ष्मी मंदिरात देवभेटणेचा कार्यक्रम आटोपल्यावर आपल्या ताब्यातील दुचाकीवर (एमएच-०८-बीए-०७०६) पाठीमागे संजय सनगरे यांना बसवून खरवते येथे जात होते. ते खरवते येथील तीव्र उतारातील वळणावर आले असता सूर्यकांत वारेकर यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी घसरून २० फूट दरीत कोसळली. या अपघातामध्ये संजय सनगरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामीण पोलिसात अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.
-------------
मृत्यूस कारणीभूत
झालेल्या स्वाराविरूद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील मांडवी-सदानंदवाडी रस्त्यावर निष्काळजीपणे दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या दुचाकीचालकाविरूद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. वैभव हेमंत सुर्वे (वय ३२ रा. मांडवी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल केलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. ६) रात्री साडेआठच्या सुमारास मांडवी-सदानंदवाडी येथील रॅम्पपुढील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित वैभव सुर्वे गुरूवारी रात्री दुचाकी (एमएच-0८ बीएच - ७७२८) सोबत पाठीमागे दीपक जगन्नाथ शिवलकर (वय ६०, रा. मांडवी, रत्नागिरी) यांना घेऊन मांडवी ते मिरकरवाडा रस्त्याने जात होते. तो मांडवी सदानंदवाडी येथील रॅम्पपुढील रस्त्यावर आला असता त्यांचा भरधाव दुचाकीवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या विरूद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच-०८-बीडी-४९९१) समोरून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सौबान नुरूद्दीन जयगडकर (२३) आणि समनुन खलील मजगावर (२३ ,दोन्ही रा. पांजरी मोहल्ला,रत्नागिरी) हे जखमी झाले. बुलेटवर मागे बसलेल्या दीपक शिवलकर यांचा मृत्यू झाला.
------------
मिरजोळेत हातभट्टीवर
पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत दारूसाठी लागणारे गूळ व नवसागरमिश्रित रसायन व इतर साहित्य असा एकूण २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिसात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. संदेश गणपत जाधव (५३, रा. मिरजोळे, बौद्धवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १०) सकाळी सव्वासातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हा मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू बनवण्यासाठी लागणारे २०० लिटर गूळ नवसागरमिश्रित कुजके रसायन व इतर हातभट्टीचे साहित्य स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश पवार यांनी पोलिसात तक्रार दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

