‘बीएसएनएल’ ठप्प; मोबाईलधारक त्रस्त

‘बीएसएनएल’ ठप्प; मोबाईलधारक त्रस्त

Published on

‘बीएसएनएल’ ठप्प;
मोबाईलधारक त्रस्त
आरोंदा ः येथील बीएसएनएल टॉवरद्वारे गोव्याच्या हद्दीत मिळणारी रेंज दीड-दोन महिन्यांपासून मिळत नसल्याने मोबाईलधारकांची गैरसोय होत आहे. आरोंदा येथे बीएसएनएल टॉवर आहे. आरोंदा सिंधुदुर्ग व गोव्याच्या मध्ये तेरेखोल नदी असून या नदीच्या पलीकडे देवसू, मानशीवाडा, भालखाजण, पालये, किरणपाणी, कैरी आदी गावे आहेत. भौगोलिकदृष्ट्या हे गाव गोव्याच्या हद्दीत असले तरी या गावांच्या वर उंच डोंगर असल्याने व हे गाव खाली असल्याने अंतराने जवळ असलेल्या टॉवरची रेंज मिळत नाही. उलट आरोंदा येथील टॉवरचे अंतर हे गोव्याच्या हद्दीजवळ असून कोणत्याही अडथळ्याशिवाय मोबाईलला चांगली रेंज मिळत असे. बीएसएनएलला चांगली रेंज मिळत असल्याने गोव्याच्या हद्दीतील बर्‍याच जणांनी बीएसएनएल कार्ड घेतले; मात्र गेले दीड-दोन महिने या भागात रेंज मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागातील काही ग्राहक आरोंदा येथे समस्या मांडण्यासाठी गेले असता, तेथील कार्यालय बंद केल्याचे समजले.
.........................
विनायक राऊत
आज सावंतवाडीत
सावंतवाडी ः ठाकरे शिवसेना व काँग्रेस चारही नगरपालिका निवडणुकीत आपापले संभाव्य उमेदवार निश्चित करून आहेत. महाविकास आघाडी करायची की नाही, या संदर्भात आता बोलणे सुरू झाले आहे. माजी खासदार विनायक राऊत उद्या (ता. १३) सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात येणार आहेत. यावेळी सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपालिका निवडणुकीचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीला लागली आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून माजी आमदार जयानंद मठकर यांच्या स्नुषा तथा सामाजिक कार्यकर्त्या सीमा मठकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्या कुठल्याच पक्षात नसल्याने त्यांचा पक्षप्रवेश उद्या राऊत यांच्या दौर्‍यात होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत; मात्र वेंगुर्लेत काँग्रेसचे विलास गावडे तर सावंतवाडी, मालवण येथे ठाकरे शिवसेना अशी आघाडी ठरणार आहे. कणकवलीबद्दल फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. राऊत यांच्या चर्चेनंतरच सर्व स्पष्ट होणार आहे.
....................
वेंगुर्ले रुग्णालयास
सोनोग्राफी मशीन
वेंगुर्ले ः येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून नवीन सोनोग्राफी मशीन प्राप्त झाले आहे. त्यामुळे दर मंगळवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत गर्भवती मातांची सोनोग्राफी होणार आहे. रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डॉ. स्वप्नाली माने या उपस्थित गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी करतील. सेवेचा लाभ गर्भवती मातांना होणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी दिली.
....................
आरोंदा भद्रकालीचा
२४ ला जत्रोत्सव
आरोंदा ः आरोंदा गावचे दैवत श्री देवी सातेरी-भद्रकाली पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव २४ नोव्हेंबरला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून रात्री देवीची सवाद्य पालखी निघणार आहे. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान उपसमिती अध्यक्ष बबन नाईक व मानकरी, ग्रामस्थांनी केले आहे.
-----
पाट येथे मंगळवारी
महारक्तदान शिबिर
म्हापण ः पाट ग्रामस्थ युवक मंडळातर्फे मंगळवारी (ता. १८) सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण प्राथमिक शाळा पाट क्र. १ येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com