चिपळूण-वाहतूक कोंडीत हरवले चिपळूण शहर

चिपळूण-वाहतूक कोंडीत हरवले चिपळूण शहर

Published on

rat12p6.jpg-
03900
चिपळूणः व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील पार्किंगच्या जागेत कपडे विक्रीसाठी ठेवले आहेत.
rat12p7.jpg-
03901
चिपळूणः शहरातील रस्त्यांवर दुकाने उभी केल्यानंतर होणारी वाहतूककोंडी.
-----------

वाहतूककोंडीत हरवले चिपळूण शहर
व्यापाऱ्यांची दुकाने रस्त्यापर्यंत; अतिक्रमणे, फेरीवाल्यांचा विळखा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः चिपळूण शहराचा विस्तार हळूहळू होत असून, लोकसंख्याही वाढत आहे; मात्र बाजारपेठ वाढलेली नाही. त्यामुळे शहरात वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. खोकेधारकांनी अतिक्रमण केले तर पालिका त्यांच्यावर कारवाई करते मग रस्त्यात उभे राहून ग्राहकांना खरेदीची सोय करणाऱ्या दुकानदारांवर पालिका कारवाई का करत नाही, अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक ठराविक दुकानातून साहित्य खरेदी करतात. दुसरीकडे शहरातील मोठ्या दुकानदारांनी आपल्या दुकानांचा इतर भागात विस्तार केलेला नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांची गर्दी मुख्य बाजारपेठेत होते. लोकसंख्या वाढल्याने नागरिकांचे वैयक्तीक वाहनांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील रस्ते अरूंद आहेत. त्यांचे रूंदीकरण करायचे म्हटले तर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रस्त्यापर्यंत मांडली आहेत.
अर्बन बॅंकेसमोरील रस्त्याचे रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे; मात्र त्याला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी गटारेही बुजवली आहेत. ग्राहक दुकानात येत नाहीत म्हणून अनेक कापड व्यावसायिकांनी दुकानाबाहेर मोकळ्या जागेत कपडे विक्रीसाठी ठेवले आहेत. ग्राहकांना रस्त्यात उभे राहून खरेदी करण्याची संधी मिळते. काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील मोकळ्या जागा किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांना भाड्याने दिल्या आहेत.
अपुऱ्या रूंदीच्या रस्त्यावर रिक्षांची पार्किंग केली जाते. दुचाकीसह चारचाकी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. किराणा दुकानदारांना साहित्य पुरवठा करणारी वाहने दिवसा बाजारपेठेत आली तर वाहतूककोंडीमध्ये आणखी भर पडते. चिपळूण शहरातील रस्ते वाहनांच्या तुलनेत अपुरे पडू लागले आहेत. त्यातही चारचाकी व दुचाकी वाहनचालकांच्या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे शहरातील नागरिकांना सततच्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. चिपळूणमधील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिस व चिपळूण नगरपालिका यांच्यात समन्वय होणे आवश्यक आहे.

चौकट
सम, विषम पार्किंगचे वाजले बारा
पालिकेने शहरात सम, विषम पार्किंगचे व नो पार्किंगचे फलक बसवले आहेत तरीही बेशिस्तीने वाहनपार्किंग सुरू आहे. सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी चार ते रात्री ९ वाजेपर्यंत शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मार्कंडी, चिंचनाका, मुख्य बाजारपेठेतील खेडेकर क्रीडासंकूल, पालिका परिसर, भाजीमंडई परिसर, गांधीचौक, नाथ पै चौक, भेंडीनाका या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. ‘नो पार्किंग’च्या फलकाशेजारीच मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग करून ठेवली जात आहेत.

कोट
वाहतूक पोलिस आणि पालिकेकडून वाहतुकीचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापनाचा अभाव असल्यानेच वाहतूककोंडी होत आहे. चिंचनाक्यातून गुहागर नाक्यापर्यंत वाहतूककोंडीतून जाण्यासाठी किमान वीस मिनिटे लागतात. त्यामुळे इंधन आणि वेळ दोन्हीही वाया जाते.
- बरकत पाते, ग्रामस्थ

कोट
वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी पालिकेने पर्यायी रस्ते तयार केले आहेत. नागरिकांनी त्याचा वापर केला तर वाहतूककोंडीतून काही प्रमाणात सुटका होऊ शकते. या विषयावर मार्ग काढायचा असेल तर सर्व नागरिक, व्यापारी, पोलिस, लोकप्रतिनिधी आणि पालिका या सर्वांचा सहभाग गरजेचे आहे. सर्वांनी ठरवले तरच हा प्रश्न सुटू शकेल.
- मंगेश पेढांबकर, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण पालिका

चौकट
या उपाययोजनांची गरज...
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे
- रस्त्यांची रूंदी वाढवणे
- अतिक्रमणे हटवणे
- अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई
- सिग्नल यंत्रणा सुरू करणे
- वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी
- पर्यायी रस्त्यांचा वापर करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com