-राज्यातील तज्ज्ञ समीक्षकांच्या उपस्थितीत १५ रोजी चर्चासत्र
‘कला-साहित्य-संस्कृती’वर प्रबोधनाचा देवरूखमध्ये मेळा
१५ रोजी चर्चासत्र; राज्यातील १५हून अधिक तज्ज्ञ समीक्षकांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १३ ः देवरूख येथील डी-कॅड महाविद्यालयात प्रा. श्री. पु. भागवत यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘कला-साहित्य-संस्कृती- व्यवहार’ या विषयावर १५ नोव्हेंबर रोजी चर्चासत्र आयोजित केले आहे. त्याची जबाबदारी नाशिक जिल्ह्यातील अनुष्ठुभ् प्रतिष्ठान या वाङ्मयीन संस्थेसह उद्योजक अजय पित्रे आणि देवरूख येथील डी-कॅड कॉलेजने घेतली आहे. या चर्चासत्रात लोकसंस्कृती, भाषासंस्कृती, माध्यमसंस्कृती, वाङ्मयीन संस्कृती या उपविषयांवर चार चर्चासत्रे होतील. महाराष्ट्रातील विविध भागातून पंधराहून अधिक अभ्यासक आपली मते मांडणार आहेत. यामध्ये साहित्य अकादमी विजेते लेखक, रंगमंच नाटकाचे दिग्दर्शक, लोककला कलावंत, माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ, पत्रकार आणि वाङ्मय समीक्षकांचा समावेश आहे.
अनुष्ठुभ प्रतिष्ठान हे १९७७ ला स्थापन झाले. कवी कुसुमाग्रज, कवी पु. शि. रेगे, विचारवंत प्रभाकर पाध्ये, नरहर कुरुंदकर, समीक्षक गंगाधर पाटील, म. सु. पाटील आदींचा त्यात सहभाग होता. नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वेजंक्शन गावात विविध मंडळी वेळोवेळी साहित्य चर्चा, वाङ्मय मंथन, काव्यास्वादासाठी एकत्र येत. अशा अनेक बैठकांमधून अनुष्टभची स्थापना झाली आणि त्याच नावाने एक वाङ्मयीन नियतकालिकाही प्रकाशित होऊ लागले. कोकणातील जिल्ह्यात या प्रतिष्ठानचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर अनुष्ठुभचे अध्यक्ष आहेत. देवरूखमध्ये प्रथमच त्यांच्यातर्फे चर्चासत्र आयोजित केले जात आहे. त्यासाठी कॉलेजचा मूळ परिसर हा विख्यात संपादक-समीक्षक दिवंगत प्रा. श्री. पु. भागवत यांचे जन्मस्थळ आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कला-साहित्य-संस्कृती-व्यवहार या विषयावर होणार आहे. चर्चासत्राचे उद्घाटन उद्योजक अजय पित्रे यांच्या हस्ते होणार असून, बीजभाषक म्हणून प्रा. वसंत डहाके उपस्थित राहणार आहेत.
------
चौकट
असा आहे कार्यक्रम
चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात ११ ते १२ या वेळेत लोकसंस्कृती या विषयावर वक्ते डॉ. गोविंद काजरेकर, डॉ. मुकुंद कुळे व शाहिद खेरटकर आपले विचार मांडणार आहेत. या सत्राचे अध्यक्षस्थान अतुल पेठे भूषवणार आहेत. दुसरे सत्र भाषासंस्कृती या विषयावर दुपारी १२ ते १ या वेळेत डॉ. दीपक पवार व डॉ. नंदकुमार मोरे विचारमंथन घडवून आणणार असून, या सत्राचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंगडे असतील. तिसरे सत्र दुपारी २ ते ३ या वेळेत माध्यमसंस्कृती या विषयाशी संबंधित असून, या चर्चासत्रात युवराज मोहिते, संपदा जोगळेकर व पराग वडके यांचा सहभाग असून, अध्यक्षस्थान डॉ. महेश केळुसकर भूषवणार आहेत. शेवट चौथे सत्र दुपारी ३ ते ४ या वेळी वाङ्मयीनसंस्कृती या विषयाशी संबंधित असून, त्यामध्ये डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. आशुतोष पाटील, डॉ. शीतल पावसकर-भोसले आपले विचार मांडणार आहे. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. अविनाश सप्रे भूषवणार आहेत. समारोप प्रा. डॉ. सुरेश जोशी यांच्या भाषणाने होणार आहे. तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि वाङ्मयप्रेमींनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

