महायुतीतील भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता

महायुतीतील भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता

Published on

-rat१३p१८.jpg-
२५O०४१५५
रत्नागिरी नगरपालिका
-------
राजकारण---लोगो

रत्नागिरीत महायुतीत भाजपमध्ये अस्वस्थता
इच्छुकांची भाऊगर्दी ; बंडखोरीची मोठी शक्यता, राणे यांची अस्पष्ट भूमिका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : रत्नागिरीत महायुतीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत हे आग्रही असताना मात्र राणेंची महायुतीबाबत भूमिका अस्पष्ट आहे. त्यामुळे भाजपत अस्वस्थता निर्माण झाली आहे. रत्नागिरीत इच्छुकांची संख्या सुमारे ६७ इतकी आहे. त्यात महायुती झाल्यास ८ किंवा ९ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. या सर्व राजकीय परिस्थितीमुळे भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या राजकीय चर्चांमध्ये जुन्या व निष्ठावंतांना डावलले जात असल्याच्या तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे गेल्यामुळे त्याची गंभीर दखल घेतली गेली आहे. सुवर्णमध्य साधण्यासाठी पुन्हा जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचे धोरण भाजपमधील वरिष्ठांनी घेतले असून, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि सचिन वहाळकर यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्यात जरी महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागावाटपांवरून भाजप-शिवसेना एकत्र येणार नाहीत असेच राजकीय चित्र होते; परंतु महाविकास आघाडीला शह देण्यासाठी महायुती होणे महत्त्वाचे असल्याचे दोन्ही पक्षाला पटल्यामुळे शिवसेना नेते उदय सामंत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारामुळे अखेर रत्नागिरीत महायुती झाली. महायुतीच्या समन्वयाच्या बैठका झाल्या. त्यात महायुतीचा भगवा फडकवू, असा दावा केला गेला होता; परंतु भाजपमध्ये वेगळेचे चित्र आहे. महायुतीबाबत मंत्री नीतेश राणे यांची भूमिका स्पष्ट नाही. युती झाली असतानाही समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर वेगळा विचार करू. आम्हाला कमी लेखू नका, असा सूचक इशारा मंत्री राणे यांनी पावस येथे पत्रकारांशी बोलताना दिला होता. त्यात रत्नागिरी पालिकेसाठी भाजपच्या सुमारे ६७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. स्वबळावर लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजपच्या वाट्याला केवळ ८ किंवा ९ जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित इच्छुकांनी काय करायचे, त्यांना थोपवायचे कसे असा मोठा प्रश्न भाजपपुढे आहे. प्रभाग १० मध्ये विविध पक्षाचे १३ इच्छुक आहेत. प्रभाग ७ मधील भाजपच्या इच्छुकांनी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील बैठकीत शक्तिप्रदर्शनही केलेले आहे तसेच प्रभाग १५ मध्येही इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात अपेक्षित प्रभाग मिळाले नाहीत तर बंडखोरी थोपवण्याचे आव्हान राहणार आहे. महायुती झाली तरीही भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चौकट
पटवर्धन, वहाळकरांची नियुक्ती
गेल्या काही दिवसांपासून भाजपत नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी दिली गेली; परंतु पक्षात गटतट वाढत होते. याबाबत काही निष्ठावंतांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली. या तक्रारीची दखल घेऊन जुन्यांना पुन्हा पक्षात संधी देण्याचे धोरण भाजपने राबवले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात भाजपतर्फे जिल्हा संयोजकपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली. रत्नागिरी नगरपालिका निवडणूक संयोजकपदी सचिन वहाळकर यांची नियुक्ती केली. हे दोघेही भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असून, अॅड. पटवर्धन हे मागील नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com