ग्रामीण भागात बिबट्याची दहशत
राजापूर परिसरात बिबट्याची दहशत
वाटुळमध्ये दुचाकीस्वाराचा पाठलाग ; बंदोबस्ताची मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये मुक्त संचाराने बिबट्याने लोकांमध्ये दहशत निर्माण केलेली असताना वाटूळ येथे बिबट्याने एका दुचाकीस्वार तरुणाचा पाठलाग केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, त्या तरुणाला कोणतीही दुखापत झालेली नाही; मात्र या घटनेने वाटूळ परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या वर्षभरापासून शहराच्या विविध भागांमध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार आहे. लोकवस्तीमध्ये दिवसाढवळ्या संचार करणारा बिबट्या यापूर्वी अनेकांनी पाहिला आहे. काही महिन्यांपूर्वी पेंडखळे येथे रात्रीच्यावेळी वाहनचालकांना बिबट्या रस्त्यानजीकच्या झाडीमध्ये आढळून आला होता. दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची सातत्याने लोकांकडून मागणी केली जात असली तरी, त्यावर वनविभागाकडून फारशा उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. अशातच वाटुळ येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने सायंकाळच्यावेळी पाठलाग केल्याची घटना घडली. बिबट्यासोबत छोटे बछडेही असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमध्ये दुचाकीस्वार तरुण बचावला असून, त्याला सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही. त्यामुळे दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी वाटुळ ग्रामस्थांकडून वनविभागाकडे करण्यात येत आहे.

