बदललेल्या रचनेचा उमेदवारांना फटका
निवडणुक पानासाठी (प्रभागाचे अंतरंग- भाग २ - सावंतवाडी)
बदललेल्या रचनेचा उमेदवारांना फटका
प्रभाग दोनमधील स्थिती ः रंगत वाढण्याची चिन्हे
रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः येथील पालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये सुद्धा बदललेल्या प्रभाग रचनेचा फटका उमेदवारांना बसणार आहे प्रामुख्याने या प्रभागामध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे इच्छुक असल्याने आणि भाजपच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवल्यास या प्रभागात काहीशी रंगत येणार आहे.
प्रभाग क्रमांक दोन हा नेहमी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या सोबत राहिला आहे. या ठिकाणी गतवेळी खेमराज उर्फ बाबू कुडतरकर तसेच दिपाली सावंत या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु, यावेळी प्रभाग रचनेमध्ये मोठा फरक असल्याने काहीसे राजकीय समीकरण बदलले आहे. बदललेल्या प्रभाग रचनेत केसरकरांसोबत नेहमी असणारा सबनीसवाडा हा भाग 70 टक्के दुसऱ्या प्रभागाला जोडला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी शिंदे शिवसेनेला म्हणजेच आमदार दीपक केसरकर यांना काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु, दुसरीकडे लाखेवस्ती भटवाडीचा अर्धा भाग तसेच बोर्जेसवाडा, नागवेकर आवाट हा भाग प्रभाग दोनमध्ये जोडला गेल्याने त्या ठिकाणची मते विजयी उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहेत. प्रभाग दोनला नव्याने जोडलेला भाग हा मागच्या वेळेस भाजपच्या बाजूने राहिला होता. यातील लाखे वस्ती हा समाज नेहमीच केसरकरांसोबत राहिला आहे. मात्र, यावेळी लाखे वस्तीमध्ये दोन गट पाहायला मिळत आहेत. एका गटाने भाजप तर दुसऱ्या गटाने आमदार दीपक केसरकर यांच्या सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रभाग दोनमध्ये युती न झाल्यास भाजप आणि शिंदे शिवसेना स्वतंत्र रिंगणात असल्यास मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे.
प्रभाग क्रमांक दोनचे आरक्षण हे ओबीसी महिला आणि खुले असे पडले आहे. या ठिकाणी 2 हजार 300 मतदार असून त्यापैकी 1700 इतके मतदान होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजप पक्षात नुकतेच प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना रिंगणात उतरविणार, अशी चर्चा आहे तर शिंदे शिवसेनेकडून नगरसेवक राहिलेले बाबू कुडतरकर यांना रिंगणात उतरवणार असल्याचे समजते. महिलांमधून भाजपकडून अद्यापही इच्छुक चेहरा समोर आलेला नाही तर शिंदे शिवसेनेकडून माजी नगरसेवक असलेल्या संजय पडणेकर यांची पत्नी संजना पेडणेकर यांना रिंगणात उतरविले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तशा प्रकारची चाचपणी करण्यात आली आहे. ठाकरे शिवसेनेकडून गजानन वाडकर यांचेही नाव चर्चेत आहे. अन्य पक्षाकडून मात्र अद्यापही काहीच हालचाली किंवा उमेदवारांची नावे समोर आलेली नाही. एकूणच या ठिकाणी साळगावकर विरुद्ध कुडतरकर अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, उमेदवारी फायनल झाल्यावर नेमके चित्र समोर येणार आहे.
श्री. साळगावकर यांचा विचार करता त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. तत्पूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे. शहराच्या एकूणच परिस्थितीबाबत त्यांना जाण आहे. प्रशासन नेमके कसे चालवायचे0 यामध्ये त्यांचा हातखंडा असून त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या काळात उत्तम प्रकारे काम केलेले आहे. त्यांना उमेदवारी निश्चित झाल्यास याचा फायदा त्यांना प्रभाग दोनमध्ये निश्चितच होणार आहे. परंतु, कुडतरकर यांचे आव्हान त्यांना निश्चितच राहणार आहे. त्यांनी सुद्धा नगरसेवक म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांचाही प्रभागातील जनतेची नेहमीच संपर्क असतो. आपल्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघांमध्ये कामाची पोचपावती दिलेली आहे. शिवाय केसरकर यांचा पाठिंबा असल्याने त्यांना जनतेकडून साथ मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे शिवसेनेकडून गजानन वाडकर यांना उमेदवारी दिल्यास ते सुद्धा या ठिकाणी बदललेली राजकीय परिस्थिती तसेच गेल्या चार वर्षांमध्ये होऊ न घातलेली निवडणूक आणि त्यामुळे जनतेच्या संपर्कात पडलेली फुट याचा फटकाही इच्छुक उमेदवारांना बसू शकतो. मात्र, ज्यावेळी उमेदवारी जाहीर होईल आणि प्रचाराला सुरुवात होईल त्याचवेळी प्रभागातील राजकीय गणित सखोल पद्धतीने समोर येईल.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

